मुंबई : महाराष्ट्राची महावाहिनी म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करत झी मराठी ‘ने अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आपल्या ‘ आंबा महोत्सव २०२६’ च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते. फळांचा राजा आंबा आणि मनोरंजनाची राणी झी मराठी यांनी या महोत्सवात कलाकार, पत्रकार आणि मान्यवर मंडळींसोबत अविस्मरणीय अनुभव घेतला. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर झी मराठीने यंदा अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात ‘आंबा महोत्सव’चे दुसरे पर्व सादर केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनची जबाबदारी घेतली होती ती अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री तनिष्का विशे यांनी.
या महोत्सवात ‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’, ‘शुभ श्रावणी’, ‘दीपज्योती’, ‘वीण दोघातली हे तुटेना’, ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘तुला जपणार आहे’ या मालिकांमधील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला. हास्य, आठवणी आणि आंब्यावर आधारित मजेशीर खेळांनी संपूर्ण दिवस रंगून गेला. सर्वात पहिल्या खेळात जोड्या मंचावर अवतरल्या आणि चढाओढ रंगली ती वर टांगलेल्या टोपलीत कोण जास्त लवकर आंबे पोहोचवणार? या खेळात धमाल उडाली. काही जोडप्यांनी खेळात भाग घेतला, तर काहींनी प्रेक्षक म्हणून या मजेचा मनमुराद आनंद लुटला. यानंतर कलाकारांनी “आंबा-कारल शॉट्स” या खेळात दरम्यान सेटवरील अनेक मजेशीर किस्से उलगडले यात आपल्या लाडक्या ज्योतीला कारल्याचा जूस प्यावा लागला. त्यानंतर घरातील मोठ्यांनी पुढाकार घेत आमरस काढण्याची जबाबदारी सांभाळली. आणि आमरस तयार करून त्यांनी आपल्या टीममधील सह कलाकारांना तो चाखायला दिला आणि आपल्या टीमला विजयी बनवले. शेवटी झी मराठीच्या सर्वात छोट्या सदस्यांनी म्हणजेच सावल्याची जणू सावली मालिकेतील अबीर आणि ओवी यांनी “आंबा-पाणी” हा खेळ रंगवला. या खेळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग घेत जल्लोष केला. एकूणच, आंबा महोत्सवात प्रत्येक जण उत्साह, आनंद आणि धमाल मस्तीमध्ये रंगून गेला. खेळांतील विजेत्यांना आणि सर्व कलाकार, पत्रकार मित्रांना हापूस आंब्यांची भेट देण्यात आली, ज्यामुळे उत्सवाची गोडी आणखी वाढली.
याच मंचावरून झी मराठीने त्यांच्या आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ ह्या मालिकेचा नवीन प्रोमो पत्रकार आणि प्रेक्षकांसमोर आणला. या मालिकेतून बहुआयामी आणि जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ ‘कृष्णा आई’ची भूमिका साकारणार आहेत. तसेच, या ‘आंबा महोत्सवात’ आणखी काही खास चाहूलही लागली असून महाराष्ट्रातील लाडक्या वहिनींसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे ‘दार उघड बये’ म्हणत झी मराठी लवकरच कोणीतरी येणार आहे. याचसोबत मराठी Z5 ला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदही येथे साजरा करण्यात आला आणि वाहिनीने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. ‘आंबा महोत्सव’च्या दुसऱ्या पर्वासह झी मराठीने परंपरा, संस्कृती, आणि प्रभावी कथाकथनाचा उत्सव अधिक भक्कमपणे साजरा केला आहे.