चेन्नई : अभिनेत्री तृषाविरोधात कथित टिप्पणी केल्याप्रकरणी तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे.वृत्तानुसार, मद्रास उच्च न्यायालयात तमिळनाडू सरकारने सांगितले की, चौकशीनंतर उदयनिधी स्टालिन यांची आजच पोलीस ठाण्यातून जामिनावर सुटका करण्यात येईल. तसेच, त्यांना कोठडीची मागणी करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नसल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे.
अभिनेत्री तृषा यांच्याविरोधात कथित टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टालिन यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच तमिळनाडू महिला छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या महिला आघाडीने तंजावूर पूर्व पोलीस ठाण्यात उदयनिधी स्टालिन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतले.टीव्हीकेने आरोप केला आहे की, उदयनिधी स्टालिन यांनी अभिनेत्री तृषा यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले असून त्यामुळे त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे.
सोमवारी उदयनिधी स्टालिन तंजावूर येथे कावेरी पाणीवाटप वादाच्या मुद्द्यावर आयोजित जनसभेला संबोधित करत होते. यावेळी उपस्थित जमावाने ‘तृषा, तृषा’ अशा घोषणा दिल्यानंतर त्यांनी तृषा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनिधी स्टालिन म्हणाले, “कट, कॉपी आणि पेस्ट करून खोटी बातमी पसरवण्यात आली आहे. मी कधीही न केलेले वक्तव्य माझ्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी अशा गोष्टींना घाबरणारा व्यक्ती नाही. या प्रकरणाला मी कायदेशीर मार्गाने सामोरे जाईन.