मुंबई : ‘वेलकम’ (Welcome) या लोकप्रिय चित्रपट मालिकेतील अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांनी साकारलेली ‘उदय’ आणि ‘मजनू’ ही पात्रे प्रेक्षकांना खूप आठवली. आता, मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते फिरोज नाडियादवाला या लोकप्रिय जोडीला एका आगामी ‘झोम्बी-कॉमेडी’ चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आणण्याच्या तयारीत आहेत. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर आणि नाना पाटेकर पूर्णपणे नवीन भूमिकांमध्ये दिसू शकतात. या प्रकल्पाबाबत दोन्ही कलाकारांशी चर्चा सुरू असल्याचे समजते.
वृत्तानुसार, अनिल आणि नाना यांच्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या भूमिका त्यांच्या मूळ ‘उदय’ आणि ‘मजनू’ या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळ्या असतील. आधुनिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी जोडी सादर करण्याचा निर्मात्यांचा उद्देश आहे. दरम्यान, मुख्य भूमिकेसाठी टायगर श्रॉफची निवड होण्याची शक्यता असून, यामुळे चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
हा प्रकल्प सध्या लेखन टप्प्यावर असून तो एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट म्हणून विकसित केला जात आहे. लहान मुले आणि कुटुंबे अशा सर्वांनाच आवडेल असा हलका-फुलका ‘झोम्बी-कॉमेडी’ चित्रपट बनवण्याचा निर्माते फिरोज नाडियादवाला यांचा मानस आहे. या चित्रपटाच्या कथानकात हॉरर (भयपट), विनोदी आणि ॲक्शन यांचा संगम पाहायला मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, २०२७ च्या सुरुवातीला या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होऊ शकते. जर अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांचे पुनरागमन निश्चित झाले, तर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज होईल.