तृषा कृष्णन कथित टिप्पणीप्रकरणी उदयनिधी स्टालिन पोलिसांच्या ताब्यात

0

चेन्नई : अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी द्रमुक नेते आणि तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांना चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने पोलिसांकडे आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे (एनसीडब्ल्यू) तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. टीव्हीकेच्या तंजावूर मध्य जिल्हा महिला आघाडीच्या संयोजक एस. बैरवी यांनी तंजावूर पूर्व पोलीस ठाण्यात उदयनिधी स्टालिन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तसेच, या प्रकरणात कारवाईची मागणी करत पक्षाने राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार नोंदवली आहे.या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणीही पक्षाकडून करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, उदयनिधी स्टालिन यांना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीव्हीके कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची घोषणा केली होती. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर निदर्शने केली. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आधीपासूनच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात केले होते. स्टालिन यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. कावेरी जलवाटप वादाच्या पार्श्वभूमीवर तंजावूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेदरम्यान विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याशी संबंधित टिप्पणी केली. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech