नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) ने सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेच्या कारणास्तव आज, गुरुवारी पुन्हा १६ मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीएमआरसीने प्रवाशांना कळवले आहे की आज सकाळी ७:३० वाजल्यापासून राजीव चौक व केंद्रीय सचिवालयसह १६ मेट्रो स्थानकांवरील सेवा प्रभावित राहतील. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थानके बंद राहणार आहेत. मात्र, महत्त्वाच्या इंटरचेंज स्थानकांवर प्रवाशांना ट्रेन बदलण्याची सुविधा सुरू राहील.
डीएमआरसीने जारी केलेल्या माहितीनुसार, लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सर्वोच्च न्यायालय (सुप्रीम कोर्ट), सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग, शिवाजी स्टेडियम या मेट्रो स्थानकांवर सकाळी ७:३० वाजल्यापासून प्रवेश आणि निर्गमन बंद करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी डीएमआरसीने स्पष्ट केले आहे की राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय या प्रमुख इंटरचेंज स्थानकांवर ट्रेन बदलण्याची सुविधा उपलब्ध राहील. याचा अर्थ प्रवासी या स्थानकांवरून इतर मार्गांवरील ट्रेन पकडू शकतील; मात्र या स्थानकांमध्ये प्रवेश करणे किंवा स्थानकाबाहेर जाणे यास परवानगी दिली जाणार नाही. डीएमआरसीने प्रवाशांना या काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, प्रवासाचे नियोजन करताना या अद्ययावत माहितीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
यापूर्वी बुधवारीही ही १६ स्थानके सायंकाळी सुमारे ६:३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. सोमवारीदेखील दिल्ली मेट्रोची ७ स्थानके बंद करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांत आंदोलनामुळे राजधानीतील प्रमुख मेट्रो स्थानके बंद करण्याची ही तिसरी वेळ आहे. सलग दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नियमित प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नोकरी करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचे म्हणणे आहे की सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची असली तरी प्रवाशांना याबाबत आगाऊ आणि पुरेशी माहिती देणे तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेची अधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाविरोधात आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सीजेपी आणि विद्यार्थ्यांचे जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे.