मुंबई : येत्या मंगळवारी ९ जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यावर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांच्या युतीचे पुनर्वसू नक्षत्रात अगदी साध्या डोळ्यांनी मनोहारी दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री.सोमण म्हणाले की यावेळी गुरू-शुक्रामध्ये १.६ अंश अंतर दिसेल. शुक्र ग्रह वजा ३.९ प्रतीचा जास्त तेजस्वी दिसेल. गुरू ग्रह वजा १.९ प्रतीचा दिसेल. शुक्र ग्रह सौंदर्याचा,प्रेमाचा समजला जातो.गुरू ग्रह ज्ञानाचा,उत्कर्षाचा समजला जातो. शुक्र ग्रहाला एकही चंद्र नाही, तर गुरू ग्रहाला ११५ चंद्र आहेत. शुक्र ग्रहाचा पृष्ठभाग ७६ टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करतो तर गुरू ग्रहाचा पृष्ठभाग ५० टक्के प्रकाश परावर्तित करतो. यापूर्वी १२ ऑगस्ट २०२५ रोजी गुरू-शुक्र युती झाली होती. यानंतर पुढच्यावर्षी २५ ऑगस्ट २०२७ रोजी पुन्हा त्यांची युती होणार आहे. चंद्र १७ जून रोजी गुरू ग्रहाजवळ तर १८ जून रोजी शुक्रग्रहाजवळ दिसणार आहे असेही दा.कृ.सोमण यांनी सांगितले.