नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी; सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

0

पुणे : राज्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला पुणे सत्र न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी सदर निकाल जाहीर केला. हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने कठोर शब्दांत आरोपीचा निषेध नोंदवला. निकाल ऐकण्यासाठी पीडित चिमुरडीचे आई-वडील, आजी आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते.

निकाल देताना न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. पुणे पोलिसांनी गुन्ह्यानंतर अवघ्या १६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले, तर संपूर्ण खटल्याचा निकाल सुमारे दोन महिन्यांत लागला. या जलद आणि प्रभावी न्यायप्रक्रियेमुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. या प्रकरणातील तपासात पोलिसांसह वैद्यकीय अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, सायबर तज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकिलांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे न्यायालयाने नमूद केले. या सर्वांच्या समन्वयातून आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे सादर करण्यात यश आल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

निकालवाचन करताना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके सुरुवातीला म्हणाले की “सरकारी वकिलांनी युक्तिवादात १२ केसेसचा उल्लेख केला. त्यापैकी अनेक घटनांमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे सर्व निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य दाखवतात. काही निकालांमध्ये सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, मात्र ती हायकोर्टाने रद्द ठरवली. मात्र सत्र न्यायालयाचे निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्याचीही उदाहरणं आहेत. क्रूरता, समाजावरील परिणाम या गोष्टींची फाशी कायम ठेवताना विचार केला जातो. पीडिता स्वसंरक्षण करण्याच्या स्थितीत होती का, हेही पाहिलं जातं. दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण ठरु शकते का?” याचाही विचार सर्वोच्च न्यायालय करत असल्याचं न्यायमूर्ती म्हणाले.

“घटनेच्या वेळी आरोपी पीडितेसोबत का होता, हा प्रश्न अनुत्तरित राहिला. या प्रकरणातील सर्व बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र कट रचून शांत डोक्याने केलेली हत्या गुन्ह्याचं गांभीर्य दर्शवते. कट रचून बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. समाजावर घटनेचे दूरगामी परिणाम घडणार असतील, तरीही फाशीची शिक्षा दिली जाते.” याकडेही अंतिम निकालवाचनात न्यायमूर्तींनी लक्ष वेधलं. न्यायाधीशांनी निकालात म्हटले की, अशा अमानुष गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा आवश्यक असून तपास पथकाने केलेले कार्य इतरांसाठी आदर्श ठरणारे आहे. विशेष सरकारी वकिलांनीही प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या निकालानंतर न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी भीमराव कांबळे याला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. आरोपी सुधारण्याच्या पलिकडे आहे, असे नमूद करत न्यायमूर्तींनी हे दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याचे सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech