कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
(अनंत नलावडे)
मुंबई : राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतकरी विस्तार सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने चारही कृषी विद्यापीठांच्या गट-अ आणि गट-ब संवर्गातील एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. विशेष म्हणजे २००३ नंतर तब्बल २३ वर्षांनी हा नवा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊन संशोधन, अध्यापन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला गती मिळेल असा ठाम विश्वासही भरणे व्यक्त केला.
कृषी व पदुम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय आजच जारी केला असून, ३,६११ नियमित पदे आणि ११२ बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी पदे अशा एकूण ३,७२३ पदांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) या चारही कृषी विद्यापीठांना होणार आहे. यामुळे प्रशासकीय, शैक्षणिक आणि संशोधन व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
विद्यापीठनिहाय मंजूर पदसंख्या……
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – १,२१७ पदे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला – ९१५ पदे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी – ८९० पदे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली – ५८९ पदे याशिवाय काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांच्या आकृतीबंधा बाबतची प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू असून त्यासंदर्भातील आदेश लवकरच जारी करण्यात येतील.
आजच्या निर्णयामुळे आगामी काळातील
कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षमतेत वाढ करणारा ठरेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.