पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी आजच्या Gen Z पिढीला राष्ट्रनिर्माणासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्याचा केवळ उपभोग न घेता देशाला विकसित, सक्षम आणि सुरक्षित बनविण्याची जबाबदारी प्रत्येक युवकाने स्वीकारावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित समारंभात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी युवकांना राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी संदेश दिला. विशेषतः Gen Z पिढीने राष्ट्रनिर्माणासाठी पुढाकार घ्यावा आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुरस्कार स्वीकारताना डोवाल म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे. लोकमान्य टिळकांसारख्या महान राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्याचा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुण्यात शिक्षण घेत असताना टिळकांच्या विचारांवर अनेक व्याख्याने ऐकली होती. त्यावेळी भविष्यात त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळेल, अशी कल्पनाही केली नव्हती.”
युवकांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या पिढीने लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पनेचा अभ्यास करण्याची गरज आहे. टिळकांनी देशासाठी केलेला त्याग आणि समर्पण हे प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे. डोवाल यांनी स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट करताना म्हटले की, “स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करण्याची मोकळीक नव्हे, तर राष्ट्रहिताची जबाबदारी स्वीकारणे होय.” देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून विकसित, सक्षम आणि सुरक्षित भारत घडविण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.