नीट पेपरफुट : मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्रीचे ४५ प्रश्न आढळल्याचा दावा

0

लातूर :  नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे. लातूर येथील आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमधील दस्तऐवजात नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाचे सर्व ४५ प्रश्न एका मास्टर सेटशी तंतोतंत जुळल्याची माहिती सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्रातून समोर आली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केलेल्या प्रश्नपत्रिकांच्या तुलनात्मक तपासणीनंतर हा तपशील उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे. सीबीआयच्या तपासानुसार, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) नीट परीक्षेसाठी प्रत्येकी १८० प्रश्नांचे चार मास्टर सेट तयार करते. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांचा समावेश असतो. २०२६ च्या परीक्षेसाठी ‘कैलास’ आणि ‘शिवालिक’ या कोडनावांचे संच वापरण्यात आल्याचे तपासात नमूद आहे.

मास्टर सेटशी प्रश्न तंतोतंत जुळल्याचा दावा : सीबीआयने जप्त केलेल्या दस्तऐवजांची मास्टर सेटशी तुलना केली असता, ‘शिवालिक’ संचातील रसायनशास्त्राचे सर्व ४५ प्रश्न जुळल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘कैलास’ संचातील ४५ पैकी ४३ प्रश्न, अन्य एका संचातील ४० प्रश्न आणि तिसऱ्या संचातील एक प्रश्नही संबंधित दस्तऐवजाशी जुळल्याचे तपासात समोर आल्याचा दावा आहे.परीक्षेपूर्वी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि एअरड्रॉपच्या माध्यमातून प्रश्न व संबंधित साहित्य प्रसारित करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. यासाठी साक्षीदारांचे जबाब, हस्तलिखित नोंदी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित संदेशांची तपासणी करण्यात आली आहे.

मॉक टेस्टमधील प्रश्नांचीही तपासणी : आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या सराव परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. सीबीआयच्या माहितीनुसार, १९ एप्रिलच्या मॉक टेस्टमध्ये ‘कैलास’ संचातील १५ प्रश्न, तर ३० एप्रिलच्या सराव परीक्षेत ‘शिवालिक’ संचातील सहा आणि दुसऱ्या संचातील पाच प्रश्न समाविष्ट होते.तसेच आरोपी शिक्षक प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी यांच्या मोबाईलमधून जप्त करण्यात आलेल्या १३ प्रश्नांच्या प्रतिमा चारही मास्टर सेटशी जुळल्याचे तज्ज्ञांच्या अहवालात नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुरवणी आरोपपत्रात १३ जणांचा समावेश : दिल्लीतील जलदगती न्यायालयात २८ जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात १३ जणांना आरोपी करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये एनटीएशी संबंधित तज्ज्ञ मनीषा मंधारे, प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि मनीषा संजय हवालदार यांच्या नावांचा समावेश असल्याचे वृत्तात नमूद आहे.तपासात जयपूर येथील आरोपी विकास बिवल याला पाच हजार रुपयांची आगाऊ रक्कम दिल्याचा उल्लेखही आहे. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवरून अनेक प्रश्नांच्या पीडीएफ फाइल्स प्रसारित झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.या प्रकरणातील आरोपांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, संबंधित व्यक्तींवरील आरोप सिद्ध झाले आहेत, असे समजता येणार नाही. देशभरातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणात सीबीआयचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech