अमरनाथ यात्रेकरूंच्या ताफ्यातील बसेसचा अपघात, १८ भाविक जखमी

0

रामबन : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर आज, सोमवारी सकाळी अमरनाथ यात्रेकरूंच्या ताफ्यात भीषण अपघात झाला. पहलगामकडे जात असलेल्या जेकेआरटीसीच्या दोन बसांची जोरदार धडक झाली. या अपघातात एक कारही सापडल्याने तिचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत एकूण १८ भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामबन जिल्ह्यातील चंदेरकोट लंगर पॉइंट परिसरात सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, सीआरपीएफ , भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी तातडीने संयुक्त बचाव मोहीम राबवली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बस आणि कारमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

रामबनचे उपायुक्त मोहम्मद अलयास खान यांनी सांगितले की, जेकेआरटीसीच्या दोन बसांमध्ये झालेल्या धडकेमुळे हा अपघात झाला. धडकेचा जोर इतका होता की, त्यामध्ये एक कारही गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली. सर्व जखमींना घटनास्थळी प्राथमिक उपचार देऊन तत्काळ रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त बस आणि कार क्रेनच्या सहाय्याने हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर अमरनाथ यात्रेकरूंचा ताफा पुन्हा मार्गस्थ करण्यात आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने यात्रा मार्गावरील सुरक्षा आणि देखरेख अधिक कडक केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech