नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला

0

बादल यांच्या हाताला दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू

नांदेड : शिरोमणी अकाली दलचे (बादल) अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज,गुरुवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे हल्ला करण्यात आला. ऐतिहासिक गुरुद्वारा साहिबच्या बाहेर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्यासोबत उपस्थित होते. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, सुखबीर सिंग बादल गुरुद्वारा साहिबमध्ये प्रवेश करण्यासाठी वाहनातून उतरत असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बादल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्यानंतर सुखबीर सिंग बादल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीची ओळख आणि त्याने कोणत्या उद्देशाने हा हल्ला केला, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.घटनेनंतर गुरुद्वारा परिसर तसेच आसपासच्या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सुखबीर सिंग बादल यांच्या दुखापतीची नेमकी स्थिती आणि त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech