भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्रावरील बंदी २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली

0

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतीय विमानांना आपल्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास घातलेली बंदी आणखी एका महिन्याने वाढवली आहे. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाच्या (पीएए) माहितीनुसार, ही बंदी आता २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. या निर्णयाचा परिणाम भारतीय विमान कंपन्यांसह भारतीय कंपन्यांच्या मालकीची, त्यांच्या वतीने चालवली जाणारी किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांवरही होणार आहे. पाकिस्तानने २३ एप्रिल २०२५ रोजी पहिल्यांदा भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या बंदीला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली.पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने समाजमाध्यम मंच ‘एक्स’वरील पोस्टद्वारे बंदी वाढवल्याची माहिती दिली. या निर्बंधांमध्ये लष्करी उड्डाणांचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना युरोप, ब्रिटन आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लांबचे मार्ग निवडावे लागत आहेत.

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करता येत नसल्यामुळे भारतीय विमानांना काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागू शकतो. त्यामुळे उड्डाणाचे अंतर आणि प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. काही मार्गांवर विमान कंपन्यांचा परिचालन खर्चही वाढू शकतो. मात्र, याचा प्रत्यक्ष परिणाम संबंधित विमान कोणत्या मार्गाने प्रवास करते आणि त्यासाठी कोणता पर्यायी मार्ग निश्चित केला जातो, यावर अवलंबून असेल. ‘वृत्तानुसार, पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद राहिल्याच्या पहिल्या वर्षात भारतीय विमान कंपन्यांना सुमारे सात हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करता येत नसल्यामुळे अनेक विमानांना लांबचा मार्ग निवडावा लागत आहे. परिणामी, विमान इंधनाचा वापर आणि परिचालन खर्च वाढतो. काही लांब पल्ल्याच्या उड्डाणांचा प्रवासाचा कालावधी अनेक तासांनी वाढला आहे. लांबच्या मार्गांमुळे विमाने अधिक काळ हवेत राहतात. त्यामुळे वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेचे नियोजन, उड्डाणांचे वेळापत्रक तसेच विमानांच्या वापराचे व्यवस्थापन यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech