एकवीरा देवीच्या उत्सवात पारंपरिक वाद्यांवर बंदी; कोळी बांधवांमध्ये संताप

0

रायगड : लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावर आई एकवीरा देवीच्या दसरा उत्सवादरम्यान पारंपरिक वाद्ये वाजवण्यास आणि भक्तिगीते गाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. या निर्बंधांमुळे कोळी बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा आदर राखण्याची मागणी होत आहे. अश्विन नवरात्र आणि दसऱ्यानिमित्त आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी हजारो कोळी बांधव आणि भाविक कार्ला गडावर दाखल झाले होते. कोळी आणि आगरी समाजाचे कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीच्या उत्सवात संबळ, ढोलकी आणि ताशा यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर भक्तिगीते सादर करण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा सुरक्षेचे आणि गर्दी नियंत्रणाचे कारण देत पोलिसांनी वाद्य वाजवण्यास तसेच भक्तिगीते गाण्यास अटकाव केल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

या प्रकारामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थित भाविकांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही डीजे किंवा गोंगाट करणारी गाणी न वाजवता कुलदैवतेची पारंपरिक भक्तिगीते सादर करतो. अशा धार्मिक परंपरेवर निर्बंध घालणे अन्यायकारक असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे गडावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असले, तरी त्याचवेळी भाविकांच्या धार्मिक भावना आणि पारंपरिक प्रथांचाही विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या निर्बंधांबाबत पोलिसांची अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्याने त्यामागील नेमकी कारणे स्पष्ट झालेली नाहीत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech