बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. पारिजात पांडे यांचा ऐतिहासिक विजय

0

२२ वर्षांनंतर अनोखा विक्रम; पहिल्याच फेरीत पूर्ण केला मतांचा कोटा

मुंबई | प्रतिनिधी 

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या २५ जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत नागपूरचे ॲड. पारिजात पांडे यांनी ऐतिहासिक विजय संपादन करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच, सिंधुदुर्गचे ॲड. संग्राम देसाई आणि सोलापूरचे ॲड. मिलिंद थोबडे हे देखील बहुमताने विजयी झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते नागपूरच्या ॲड. पारिजात पांडे यांचे घवघवीत यश. त्यांनी विजयासाठी निर्धारित असलेला सुमारे ३,६८३ मतांचा कोटा मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत पूर्ण केला. २००४ सालानंतर प्रथमच एखाद्या उमेदवाराने इतक्या मोठ्या फरकाने आणि पहिल्याच फेरीत बाजी मारण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे.

पारिजात पांडे यांच्या ऐतिहासिक विजयासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. संग्राम देसाई यांनीही या निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत बहुमताने विजय संपादन केला आहे.

मतदान प्रक्रिया आणि निकष

बार कौन्सिलची ही निवडणूक ‘प्रथम पसंती’ या अत्यंत पारदर्शक अशा मतदान पद्धतीनुसार पार पडली. या निवडणुकीत मतदानासाठी विशिष्ट निकष अनिवार्य करण्यात आले होते. ज्या वकिलांनी ‘सनद’ प्राप्त केली आहे, केवळ त्यांनाच या प्रक्रियेत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता.

१ लाख ९० हजार वकिलांचा सहभाग

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही देशातील सर्वात मोठ्या बार कौन्सिल्सपैकी एक मानली जाते. या निवडणुकीत महाराष्ट्र, गोवा आणि दिव-दमण या क्षेत्रांतील तब्बल १ लाख ९० हजार वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मोठ्या सहभागामुळेच यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची ठरली.

असा मिळाला विजय

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकीच्या मतमोजणीत एकूण झालेल्या वैध मतदानाचा विचार करता यंदा ३,६८३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्याच फेरीपासून ॲड. पारिजात पांडे यांनी आपले वर्चस्व कायम राखले. प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली तेव्हा त्यांनी कोट्याचा आकडा पार करत ३,७२६ मते मिळवली आहेत व ते विजयी झाले आहेत.

२२ वर्षांनंतरच्या विक्रमाची पुनरावृत्ती

या विजयाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. यापूर्वी सन २००४ च्या बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. अनिरुद्ध चौबे यांनी प्रथम पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करून थेट विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर असा चमत्कार घडवून आणण्याचा मान ॲड. पारिजात पांडे यांनी मिळवला आहे. पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण करून निवडून येण्याची ही कामगिरी वकील वर्तुळात प्रचंड कौतुकाचा विषय ठरत आहे.

मतदारसंघाच्या सर्वच भागातून वकीलांनी दिली प्रथम पसंतीची मते

ॲड. पारिजात पांडे यांच्या या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना केवळ एका विशिष्ट भागातून नाही, तर संपूर्ण कार्यक्षेत्रातून वकिलांचा कौल त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व ३६ जिल्ह्यांमधील सुमारे १४४ पेक्षा जास्त तालुक्यांमधून अॅड. पारिजात पांडे यांना प्रथम पसंतीची मते मिळाली. तसेच गोवा राज्यात व केंद्रशासित प्रदेश दीव, दमण आणि दादरा नगर हवेली येथूनही त्यांना मतदारांनी प्रथम पसंती दिली आहेत. थोडक्यात दिव-दमण पासून ते गडचिरोलीच्या सिरोंचा पर्यंत, गोवा व कोकणातल्या सावंतवाडी पासून ते विदर्भातल्या गोंदिया पर्यंत ॲड. पारिजात पांडे यांना सर्वत्रच भरघोस मते मिळाली आहेत.

ॲड. पारिजात पांडे यांची प्रतिक्रिया

आपल्याला बार कौन्सिल सदस्य म्हणून मिळणाऱ्या अधिकारांचा पूर्ण उपयोग वकील वर्गाच्या सर्वांगीण हितासाठी सर्व शक्तीनिशी करण्यासाठी तत्पर असेन अशीच प्रतिक्रिया निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर देखील ॲड. पारिजात पांडे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये विजयी उमेदवार

पुरुष उमेदवार (सर्वसाधारण यादी)

1. पारिजात पांडे

2. गणेश शिरसाठ

3. राजेंद्र उमप

4. आशिष देशमुख

5. मिलिंद थोबडे

6. संग्राम देसाई

7. _जयंत जायभावे_

8. विठ्ठल खोंडे देशमुख

9. राजेंद्र अनभुले

10. उदय वारुंजीकर

11. गजानन चव्हाण

12. वसंत साळुंके

13. विकास ढगे-पाटील

14. सतीश देशमुख

15. ज्ञानेश्वर बागुल

16. विवेकानंद घाटगे

17. आसिफ कुरेशी

18. अहमदखान पठाण

_महिला उमेदवार_ 

1. रंजना भोसले

2. क्षितीजा वडतकर

3. अनिता कॅस्टेलिनो

4. माधवी पोतदार

5. उमा भट्टड

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech