बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, निशांत कुमारसह ३२ मंत्र्यांनी घेतली शपथ

0

पाटणा : बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात, गांधी मैदानावर ३२ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. जेडीयूचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांचा नवीन मंत्र्यांमध्ये समावेश होता. एनडीएचे पाचही घटक पक्ष—भाजप, जेडीयू, एलजेपीव्ही, एचएएम आणि आरएलएम—यांच्या प्रतिनिधींचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित एका भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी सर्व ३२ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार आणि एनडीएचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

निशांत कुमार यांच्या व्यतिरिक्त, माजी मंत्री श्रवण कुमार, अशोक चौधरी आणि लेसी सिंग यांना सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यात आले. रामकृपाल यादव, नितीश मिश्रा आणि दिलीप जयस्वाल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपच्या कोट्यातून शपथ घेतली. जेडीयूकडून रत्नेश सदा, मदन साहनी आणि शीला कुमारी यांचीही मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, श्रेयासी सिंह, मोहम्मद जामा खान आणि लखेंद्र कुमार रोशन यांच्यासारख्या चेहऱ्यांचा समावेश करून प्रादेशिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर स्थापन झालेल्या नवीन सरकारमध्ये चिराग पासवान यांचा एलजेपीआरव्ही, जितन राम मांझी यांचा एचएएम आणि उपेंद्र कुशवाहा यांचा आरएलएम यांचाही समावेश आहे. डॉ. संतोष कुमार सुमन आणि भगवान सिंह कुशवाहा यांच्यासारख्या नेत्यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. नितीश कुमार राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आणि राजीनामा दिल्यानंतर गेल्या महिन्यात सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री झाले. आज २२ दिवसांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह आणि नितीश कुमार यांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा पार पडला.

पाटणा येथील गांधी मैदानावर रत्नेश सदा, कुमार शैलेंद्र, शीला कुमारी, केदार प्रसाद गुप्ता, लखेंद्र कुमार रोशन, भगवान सिंह कुशवाह, अरुण शंकर प्रसाद, मदन साहनी, डॉ.संतोष कुमार सुमन, रमा निषाद, राम कृपाल यादव, नितीश मिश्रा, दामोदर सिंह, संजा कुमार सिंह, संजा कुमार सिंह, रवींद्र सिंह, रवींद्र सिंह आदी उपस्थित होते. श्रवण कुमार, निशांत कुमार, दिलीप जैस्वाल, लेशी सिंग, सुनील कुमार, श्रेयसी सिंग, मोहम्मद जामा खान, नंद किशोर राम, शैलेश कुमार उर्फ बुलो मंडल, प्रमोद कुमार आणि इतरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech