नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी देशातील रस्त्यांवर पसरवू इच्छित असलेल्या अराजकतेत राष्ट्रपतींनाही ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा यांनी शनिवारी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, जंतर-मंतर येथे जे काही घडत आहे, ती भारताची खरी कहाणी नाही. दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियावरील काही हँडल्सवर दाखवली जाणारी छायाचित्रे देशातील वास्तविक परिस्थिती दर्शवत नाहीत. भारत शांत असून सुशासनाच्या मार्गावर पुढे जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या एका कोपऱ्यात काही अराजक तत्त्वे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. हा अराजक तत्त्वांचा फ्लॉप शो असून तो पूर्णपणे कोसळला आहे, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका करताना संबित पात्रा यांनी त्यांना ‘नालायक नेता’ असेही म्हटले.
भाजप खासदार म्हणाले की, एक दिवसापूर्वी काही राजकीय नेते राष्ट्रपती भवनात गेले होते. तेथून बाहेर आल्यानंतर राहुल गांधी यांनी दिलेले वक्तव्य एका बेजबाबदार नेत्यासारखे होते. यापूर्वी कधीही राष्ट्रपतींना रस्त्यावरील विरोध प्रदर्शनात ओढण्याचा प्रयत्न झाला नव्हता; मात्र राहुल गांधी यांनी तसा प्रयत्न केल्याचा आरोप पात्रा यांनी केला. देशातील रस्त्यांवर जी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत, त्याच्याशी राष्ट्रपतींना जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असेही पात्रा म्हणाले. या संपूर्ण घटनाक्रमाला घटनात्मक पदाला राजकीय वादात ओढण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपने म्हटले.जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या माध्यमातून भारत आणि देशाची राजधानी दिल्ली यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पात्रा यांनी केला. आंदोलनादरम्यान जाळपोळ आणि हिंसाचाराची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होता; मात्र तसे घडू शकले नाही. त्यांच्या मते, आज जमावशाहीवर लोकशाहीचा विजय झाला आहे.
भाजप खासदार म्हणाले की, ही केवळ एका दिवसाची घटना नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने बंदची हाक दिली होती. त्यानंतर आंदोलन झाले आणि आता १२ तारखेला आणखी एका विरोध प्रदर्शनाचे आवाहन करण्यात आले आहे. ठरावीक कालावधीत देशातील वातावरण बिघडवण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातही अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा आरोप पात्रा यांनी केला. आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे ते म्हणाले. भाजपने या परिस्थितीला ‘अराजकता पसरवणाऱ्यांमधील अराजकता’ असे संबोधले.