नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून माजी सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत चीनशी झालेल्या संघर्षावरून गंभीर आरोप केले. या आरोपांच्या प्रत्युत्तरात भाजपने मनोज नरवणेंचा चीनच्या विरोधातील तत्कालिन विधानाचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यामुळे संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे लोकसभेची कार्यवाही आधी सायंकाळी ४ वाजेपर्यंत, तर नंतर पुढील दिवसापर्यंत तहकूब करण्यात आली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी बोलण्यासाठी उभे राहिले. यावेळी त्यांनी गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेचा उल्लेख करत केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावर आधारित एका लेखाचा संदर्भ दिला. राहुल गांधी म्हणाले की, भारत-चीन सीमेवर नेमके काय घडले आहे, हे लष्करातील जवानांना माहीत आहे; मात्र सरकार जनतेपासून सत्य लपवत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गोंधळ वाढल्यानंतर लोकसभेची कार्यवाही तहकूब करण्यात आली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. अमित शाह यांनी राहुल गांधींनी नोंदीवर स्पष्ट करावे की त्यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, त्या नरवणे यांनी प्रत्यक्षात म्हटल्या आहेत की नाहीत. तसेच संबंधित पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. दरम्यान, भाजपने माजी लष्करप्रमुख नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर (एक्स) शेअर केला. या व्हिडिओमध्ये नरवणे म्हणतात की, भारताने आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही. तसेच भारतीय सैन्य आजही पूर्वीच्या स्थानांवरच असल्याचे ते सांगतात. भाजपाने या व्हिडिओच्या आधारे राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.