संरक्षण निर्यातीत ब्रह्मोस क्षेपणास्त्राची महत्त्वाची भूमिका

0

ब्रह्मोस-एनजीच्या विकासाला वेग,पहिला प्रोटोटाइप लवकरच

नवी दिल्ली : ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आता केवळ एक शस्त्र प्रणाली नसून, आत्मनिर्भर भारताची शक्ती, अचूकता आणि अभिमानाचे प्रतीक बनले आहे. भारताच्या संरक्षण साहित्य निर्यातीत ब्रह्मोस महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताची संरक्षण निर्यात वार्षिक ६२.७ टक्के वाढीसह ३८ हजार ४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे ब्रह्मोस एअरोस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयतीर्थ जोशी यांनी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय लष्कराने या क्षेपणास्त्र प्रणालीचा सक्रिय युद्धात प्रथमच वापर केल्याचा दावा करण्यात आला. पाकिस्तानमधील नूर खान हवाई तळासह महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्यामुळे या प्रणालीच्या क्षमतेकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले आहे. डॉ. जोशी यांच्या म्हणण्यानुसार, ब्रह्मोसच्या निर्यातीतील यशाची सुरुवात २०२५ मधील युद्धातील वापरापूर्वीच झाली होती. भारताला या क्षेपणास्त्रासाठी पहिला ऐतिहासिक निर्यात करार २०२२ मध्ये मिळाला. फिलिपिन्ससोबत झालेल्या या बहुदशलक्ष डॉलरच्या करारामुळे भारताच्या संरक्षण निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी दिशा मिळाली. फिलिपिन्ससोबतच्या करारानंतर दक्षिण-पूर्व आशियातील आणखी दोन देशांसोबतही करार झाल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांच्याशी संबंधित ऑर्डर आणि वितरण प्रक्रियेमुळे ब्रह्मोसच्या निर्यातीचे एकूण मूल्य ६०० दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे.

उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर
ब्रह्मोस क्षेपणास्त्राची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीकडून पुरवठा साखळी आणि उत्पादन क्षमता मजबूत केली जात आहे. हैदराबाद, नागपूर, पिलानी आणि लखनौ येथील उत्पादन केंद्रांमध्ये वेगाने काम सुरू असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.प्रत्येक प्रणाली आणि उपप्रणालीसाठी सध्या असलेल्या एक-दोन औद्योगिक भागीदारांऐवजी सुमारे ४५ पुरवठादारांचे जाळे विकसित करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासोबतच खर्च आणि किमतींच्या बाबतीतही स्पर्धात्मकता वाढण्याची अपेक्षा आहे. ब्रह्मोसच्या पुढील पिढीतील आवृत्ती असलेल्या ‘ब्रह्मोस-एनजी’च्या विकासाला विशेष महत्त्व दिले जात आहे. हे सध्याच्या क्षेपणास्त्रापेक्षा आकाराने लहान, वजनाने हलके आणि प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech