जातिधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा – पंकजा मुंडे

0

बीड : दुष्काळाच्या काळात पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी समाजात जातीधर्माच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची गरज आहे.त्यामुळे जातिधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा अशी भावनिक हाक ना. पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन दिली. संत भगवानबाबा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या परंपरेच्या दसरा मेळाव्यात आठरापगड जातीतील भक्ती-शक्तीचा एकजीव ‘कुंभमेळा’ आणि जनसागराचे ‘विराटरूप दर्शन भगवान भक्तीगडावरुन झाले.

सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी उर्जादायी मार्गदर्शन केले. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर भाष्य केले. त्याचबरोबर सामाजिक सलोखा, जाती भेदरहित एकजूट, आणि जेन -जी च्या प्रमुख मुद्द्यांवर पंकजाताईंनी आपल्या खास शैलीत मांडणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे, जनावरांची तहान भागावी आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे अशी नवरात्रातील उपवास आणि देवीच्या चरणी प्रार्थना आपण केली. अंधश्रद्धेवर आपला विश्वास नाही पण काही तरी चमत्कार घडावा आणि शेतकऱ्यांचे रान भिजावे हीच भगवानबाबां प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आर्यमान पालवे, ॲड. यशश्रीताई मुंडे, ना. मेघनाताई बोर्डीकर ,माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, आ.मोनिका राजळे आ. निमित्त मुंदडा, आ.रत्नाकर गुट्टे, माजी खासदार सुजय विखे, माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार , माजीआ.केशवराव आंधळे, माजी आमदार भीमराव धोंडे, प्रा. लक्ष्मण हाके,ॲड. मंगेश ससाने, ह भ प राधाताई सानप, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते. पंकजाताईंचे सहपरिवार हेलिकॉप्टरने भगवान भक्तीगडावर आगमन झाले. हेलिपॅड ते सभास्थळापर्यंत त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. ध्यान मंदिरात संत भगवान बाबा यांचे पूजन व आरती करण्यात आली. सभेचे प्रस्ताविक डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केले तर यावेळी महादेव जानकर ,डॉ. सुजय विखे, धनंजय मुंडे यांची समयोचित भाषणे झाली. 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech