नवी दिल्ली : देशभरात नीट-यूजी परीक्षेवरून हैदोस सुरू असतानाच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) २०२४ मधील नीट-यूजी पेपरफूट प्रकरणातील आरोपी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याला ‘क्लीन चिट’ दिली आहे. तपासादरम्यान संजीव मुखियाचा प्रश्नपत्रिका चोरी किंवा वितरणाच्या कटात सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे सीबीआयने सांगितले. सीबीआयने स्पष्ट केले की, संजीव कुमार याला जाणूनबुजून वाचवले जात असल्याचे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर केले जाणारे दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे आहेत. तपास यंत्रणेने सांगितले की, या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करण्यात आला असून सर्व शक्य बाबींची सखोल चौकशी करण्यात आली.
सीबीआयच्या माहितीनुसार, सुरुवातीला बिहार पोलिसांनी नीट-यूजी २०२४ प्रश्नपत्रिका चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी संजीव मुखिया याचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आले होते, कारण यापूर्वीही तो परीक्षा प्रश्नपत्रिका लीक आणि चोरीशी संबंधित काही प्रकरणांमध्ये आरोपी होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान सीबीआयनेने प्रश्नपत्रिका चोरी, तिचे वितरण आणि त्याचा फायदा घेणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवली. या प्रकरणात आतापर्यंत पटना न्यायालयात ४५ आरोपींविरोधात अनेक आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
सीबीआयने सांगितले की, तपासादरम्यान संजीव मुखिया याचीही चौकशी करण्यात आली. नीट-यूजी प्रकरणाच्या तपासावेळी तो फरार होता. नंतर बिहार पोलिसांनी त्याला इतर प्रकरणांमध्ये अटक केली. त्यांचे नाव नीट-यूजी प्रकरणाच्या एफआयआरमध्येही असल्याने सीबीआयने त्यांना कोठडीत घेऊन चौकशी केली. चौकशी आणि सखोल तपासानंतरही संजीव मुखिया याच्याविरोधात या प्रकरणात त्यांची भूमिका सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे सीबीआयने नीट-यूजी पेपरफूट प्रकरणात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले नाही.
सीबीआयने पुन्हा स्पष्ट केले की, नीट-यूजी २०२४ प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणातील संपूर्ण कटाचा उलगडा करण्यात आला असून, या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संजीव मुखियला तपासातून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.