नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या झेड-प्लस सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांच्या निवासस्थानी, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तसेच वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि आग्रा येथील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनांनंतर सुरक्षा यंत्रणांनी हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी भारतीय युवक काँग्रेसने २७ सप्टेंबर रोजी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन तातडीने रोखले होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नवी मोतीबाग कॉलनीतील ज्ञानेश कुमार यांच्या निवासस्थानाच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. कॉलनीबाहेर अर्धसैनिक दलाची एक संपूर्ण बस तैनात करण्यात आली असून, परिसरात ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
याशिवाय, दिल्लीतील अशोक रोडवरील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या आत आणि बाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व्यतिरिक्त रॅपिड ऍक्शन फोर्स (आरएएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि दिल्ली पोलिसांचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या प्रक्रियेवरून राजकीय पक्ष आणि विविध संघटनांकडून आक्षेप नोंदवले जात असताना, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सुरक्षेत करण्यात आलेली ही वाढ महत्त्वपूर्ण मानली जात आहे.