बंगळुरू : भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय आणि नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीचे (एनएलएसयूआय) कुलपती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शनिवारी सांगितले की, काही बाह्य शक्तींमुळे निर्माण झालेल्या अनपेक्षित आणि दुर्दैवी परिस्थितीमुळे विद्यापीठाच्या ३४ व्या दीक्षान्त समारंभाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. काही काळ हा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे पार पडेल की नाही, याबाबतही शंका निर्माण झाली होती. बंगळुरू येथे आयोजित दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सरन्यायमूर्ती सूर्यकांत यांनी गेल्या काही आठवड्यांपासून या कार्यक्रमाभोवती निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा उल्लेख केला. मात्र, या परिस्थितीनंतरही विद्यापीठाचा ३४ वा दीक्षान्त समारंभ नियोजित वेळेत पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. प्राध्यापक, मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे कुटुंबीय या समारंभाला उपस्थित होते.
वकिली व्यवसायासाठी धैर्य आणि नम्रता आवश्यक : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, वकिली हा कमकुवत मनाच्या व्यक्तींसाठीचा व्यवसाय नाही. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कायदे आणि पूर्वीच्या न्यायनिर्णयांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर योग्य गोष्टींच्या बाजूने उभे राहण्याचे धैर्य आणि अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेण्याची नम्रताही महत्त्वाची आहे. त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना बौद्धिक स्वातंत्र्याचे महत्त्वही समजावून सांगितले. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी इतरांचे म्हणणे ऐकणे, व्यक्तीचे मूल्यमापन करताना तिचे पद आणि व्यक्तिमत्त्व यांत फरक करणे, तसेच कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का न लावता असहमती व्यक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कायदा ही सतत विकसित होणारी प्रक्रिया : कायद्याचे स्वरूप स्पष्ट करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, कायदा ही स्थिर किंवा बदल न होणारी गोष्ट नाही. कायद्याचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्या व्यक्तींच्या विचारांमधून आणि कृतींमधून तो सतत विकसित होत असतो.त्यांच्या या संदेशातून नव्या पदवीधरांना कायद्याचे ज्ञान, स्वतंत्र विचारशक्ती, नैतिक धैर्य आणि समाजातील सर्व घटकांप्रती संवेदनशीलता जपण्याचे आवाहन करण्यात आले.