केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हजारो तरुण एकत्रित

0

– १३ जून रोजी जंतर मंतर येथे आणखी एक आंदोलन- अन्यथा देशभरात आंदोलने करण्याचा अभिजित दिपकेंचा इशारा

नवी दिल्ली : विविध शैक्षणिक आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहार, पेपरफुटी आदी मुद्यांवरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी आज, शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे देशभरातील तरुणांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी आणि तरूणांनी या आंदोलनात सहभाग घेतला. अनेक आंदोलकांनी चेहऱ्यावर कॉक्रोचचे मास्क लावले होते आणि हातात फुले घेतली होती. तरुणांनी “धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच आंदोलनात “जय भीम”च्या घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनात सामील झाले. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. आशुतोष हे आयआयटी कानपूरचे पदवीधर आहेत. ते गेल्या वर्षी लंडनहून भारतात परतले. आंदोलनाला संबोधित करताना अभिजित दिपके म्हणाले, आपला हा लढा मोठा आहे. आम्ही गेल्या एका महिन्यापासून सोशल मीडियावर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. मात्र, कारवाई करण्याऐवजी आमचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करणे आणि पोस्ट डिलीट करण्याचे काम केले जात आहे. तुम्ही आमच्या पोस्ट डिलीट करू शकता, पण आम्हाला इथून हटवू शकत नाही. या आंदोलनादरम्यान दिपके यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र पाहायला मिळाले.

अभिजीत दीपके यांनी सांगितले की, मंत्र्यांनी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत राजीनामा दिलाच पाहिजे, अन्यथा देशभरात आंदोलने केली जातील. पुढील शनिवारी, १३ जून रोजी जंतर मंतर येथे आणखी एक आंदोलन होणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळाली होती, परंतु अभिजीत आणि सोनम वांगचुक यांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आंदोलनस्थळ सोडले आणि आंदोलन संपवले. सामंजस्याची भूमिका घेत, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखालील आंदोलनाला “एक विनंती किंवा आवाहन” म्हटले आहे. राजीनाम्यापेक्षा, सरकारने जबाबदारी घ्यावी अशी माझी इच्छा आहे, असे वांगचुक म्हणाले. सरकारने हे आंदोलन थांबवलेले नाही. आम्हाला आशा आहे की, हे सरकार भविष्यातही अशा सर्जनशील आणि विधायक अभिव्यक्तींना वाव देईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech