लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ नेपाळच्या दौऱ्यावर

0

नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ १७ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी नेपाळच्या औपचारिक दौऱ्यावर रवाना झाले आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील घनिष्ठ संरक्षण सहकार्य आणि लष्करांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. १७ ऑगस्ट २०२६ रोजी, लष्करप्रमुख तुंडिखेल येथील आर्मी पॅव्हेलियनमध्ये पुष्पचक्र अर्पण करतील आणि नेपाळी लष्कराच्या मुख्यालयात त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल. ते नेपाळ लष्कराच्या प्रमुखांशी संवाद साधतील आणि नेपाळी लष्कराच्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्सकडून परस्पर हिताच्या मुद्द्यांवर माहिती घेतील.

त्यानंतर, जनरल धीरज सेठ राष्ट्रपती भवनातील सन्मान सोहळ्याला उपस्थित राहतील. तिथे, भारतीय आणि नेपाळी लष्करांमधील परंपरेनुसार, नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या हस्ते त्यांना नेपाळी लष्कराच्या जनरल या मानद पदाने सन्मानित केले जाईल. १८ ऑगस्ट 2026 रोजी, लष्करप्रमुख शिवपुरी येथील आर्मी कमांड अँड स्टाफ कोर्सच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करतील तसेच प्रशिक्षक आणि परदेशी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. तसेच, ते नेपाळमधील वरिष्ठ मान्यवरांशी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.

१९ ऑगस्ट २०२६ रोजी, जनरल धीरज सेठ पोखरा येथील माजी सैनिकांच्या मेळाव्याला उपस्थित राहतील, वीर नारी अर्थात शहीद सैनिकांच्या पत्नी आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करतील तसेच भारतीय लष्कराच्या माजी सैनिकांशी संवाद साधतील. ते १९ ऑगस्ट २०२६ रोजी भारतात परततील.

भारत आणि नेपाळ हे दोन देश सामायिक ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बंधांनी जोडलेले आहेत. रोटी-बेटीचे नाते ही संकल्पना तसेच जनकपूर-अयोध्या आणि लुंबिनी-बोधगया यांच्यातील दुवा यामुळे दोन्ही देश परस्पर पूरक संबंध असलेले नैसर्गिक भागीदार बनले आहेत. भारत आणि नेपाळमधील भागीदारी ही लोकशाही तत्त्वे आणि प्रादेशिक शांतता व स्थिरता सुनिश्चित करण्यातील सामायिक हितावर आधारित आहे. हा दौरा भारत आणि नेपाळमधील खोलवर रुजलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लष्करी संबंध अधोरेखित करतो आणि दोन्ही लष्करांमधील सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची संधी उपलब्ध करून देईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech