आंबा बागायतदारांना हेक्टरी २२ हजार भरपाई

0

रत्नागिरी : हवामान बदलामुळे चालू हंगामात आंबा आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्य सरकारने बागायतदारांना हेक्टरी २२ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरपाई देण्याकरिता जिल्हा कृषी विभागाने बागायतदारांची माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, १५ मेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी पावसाळा लांबल्याने हंगामावर परिणाम झाला होता. त्यानंतर कडाक्याची थंडी, वाढता पारा आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील बागायतदार हवालदिल झाले. कोकण कृषी विद्यापीठ आणि जिल्हा कृषी कार्यालयाने केलेल्या पाहणीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याचे ८० ते ९० टक्के, तर काजूचे ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बागायतदारांनी केलेल्या मागणीनंतर शासनाने ही मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यात आंबा आणि काजूचे सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे.

पात्र बागायतदारांची माहिती जमा करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि महसूल अधिकारी प्रत्येक गावात जाणार आहेत. यामध्ये बागायतदारांचे सातबारा उतारे, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड तपशील अशी यादी तयार केली जात आहे. नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना १५ मेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech