चंद्रपूरातील कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; डेटा लॉक करून ७५ लाखांची मागणी

0

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील कॅन्सर केअर फाउंडेशनच्या कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॅकर्सनी रुग्णालयाच्या मुख्य सर्व्हरमध्ये घुसखोरी करून महत्त्वाचा डेटा लॉक केला असून तो अनलॉक करण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आयटी विभागाला १ जून रोजी सकाळी सर्व्हरमध्ये बिघाड असल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासणीदरम्यान सर्व्हरवर रॅन्समवेअरचा धमकीचा संदेश दिसून आला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात अज्ञात हॅकर्सनी रुग्णालयाची संपूर्ण डिजिटल यंत्रणा ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले.

हॅकर्सनी १.२३४५६ बिटकॉइन, म्हणजेच सध्याच्या बाजारमूल्यानुसार सुमारे ७५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. ही रक्कम भरल्यानंतरच डेटा अनलॉक करण्यासाठी आवश्यक ‘की’ उपलब्ध करून देण्यात येईल, अन्यथा सर्व डेटा कायमचा नष्ट केला जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे.या सायबर हल्ल्यामुळे हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम पूर्णपणे ठप्प झाली असून रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, उपचारांची नोंद तसेच प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर पोलिसांच्या सायबर विभागाकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून हल्ल्यामागील आरोपींचा शोध घेतला जात आहे. डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना आरोग्य क्षेत्रातील संस्थांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. महत्त्वाच्या संस्थांनी आपल्या सर्व्हर आणि डिजिटल डेटाच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech