महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षेसाठी सरकार कटिबद्ध

मुंबई : नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निकालावर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावल्याने महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे आणि इथे गुन्हेगारांना कोणतेही अभय नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. विधीमंडळाच्या आवारात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निकालाने न्याय मिळाला असून, महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा आहे. यापुढे कुणी असे घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाही, असा हा कडक इशारा आहे. अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात कोणतीही जागा नाही. त्यांना जगण्याचा अधिकारच नाही! महिला, मुली आणि लहान बालिकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरोधात महायुती सरकारची भूमिका सदैव कठोर राहिली आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात जगावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षा यांसाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नसरापूर प्रकरणात आज न्याय झाल्याची भावना सर्वांमध्ये निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech