पॅरिस : मध्य पूर्वेत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील करारावर सहमती होत असल्याचे संकेत समोर आले आहेत. दोन्ही देशांकडून कराराबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला धक्का दिला आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान त्यांनी इराणसोबतचा सामंजस्य करार (एमओयू) अद्याप अंतिम झालेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, गरज पडल्यास इराणवर पुन्हा हल्ला करण्याची धमकीही त्यांनी दिली.
डोनाल्ड ट्रम्प सध्या जी-७ शिखर परिषदेसाठी फ्रान्समध्ये आहेत. परिषदेदरम्यान त्यांनी इराणसोबतच्या कराराबाबत आपली भूमिका मांडली. “आम्ही इराणमधील सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. इराणसोबतचा एमओयू अद्याप अंतिम झालेला नाही,” असे ट्रम्प म्हणाले. ते पुढे म्हणाले, “जर मला काही आवडले नाही, तर आम्ही पुन्हा हल्ला करू.” इराणसोबतच्या कराराबाबत आजच्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी म्हटले की, इराणसोबतच्या संभाव्य करारामुळे बाजारपेठा अत्यंत सकारात्मक आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी येत्या एक-दोन दिवसांत पूर्णपणे खुली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या ही सामुद्रधुनी अंशतः खुली असून लवकरच ती पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. तेलाच्या किमती घसरत असल्यामुळे लोकांच्या खरेदी क्षमतेवर सकारात्मक परिणाम होईल, असे ट्रम्प म्हणाले. युद्धापूर्वीच्या पातळीपेक्षाही तेलाच्या किमती खाली येऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला.