उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अभिनेता टायगर श्रॉफची भेट

0

मुंबईत कोणत्याही गुन्हेगारी टोळीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

सेलिब्रिटींची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली सुरक्षेची ग्वाही

मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुखरूप बचावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन टायगरची भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी त्याच्या कुटुंबियांना धीर देत त्यांनी त्यांना सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी असून, या हल्ल्यामध्ये तो सुदैवाने वाचला आहे असे सांगितले. या हल्ल्यानंतर त्याचा संपूर्ण परिवार सध्या दहशतीखाली आणि चिंतेत आहे. या घटनेनंतर आपण स्वतः त्याची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कोणाशीही कोणताही वाद किंवा भांडण नसताना एका तरुण अभिनेत्यावर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला झाल्यामुळे श्रॉफ कुटुंबीय आणि विशेषतः त्याची आई आयेशा श्रॉफ या प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेतली असून, पोलिस आयुक्तांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या गुन्हेगारांना तात्काळ पकडण्यात येईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

या सोबतच चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार आणि अभिनेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या बिश्नोई गँग किंवा इतर कोणत्याही गँगकडून सेलिब्रिटींना धमकावण्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत बोलताना, “मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोणत्याही गँगची दहशत आणि सेलिब्रिटींना धमकावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, जो कुणी असे प्रयत्न करेल त्याला पोलिस जशास तसे उत्तर देतील असेही शिंदे यांनी सांगितले.

९०च्या दशकात मुंबईतील गँगवार पोलिसांनी कडक कारवाई करून पूर्णपणे संपवले होते. आताही कुणी तशीच दादागिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडले जाणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला. सर्वसामान्य नागरिकांची आणि सेलिब्रिटींची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा घटनांनंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. जर कुणाला अशा टोळ्यांकडून धमक्यांचे फोन किंवा मेसेज येत असतील, तर त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच सरकार कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे
उभे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech