
ठाणे : प्रकृतीत सुधारणा झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पूर्ण विश्रांती मिळावी आणि प्रकृती पूर्णपणे पूर्ववत व्हावी, यासाठी त्यांचा ज्युपिटर रुग्णालयातील मुक्काम आणखी तीन दिवस वाढविण्यात आला आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे यांचा नियोजित काश्मीर दौराही तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांनी राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, ठाणे तसेच पावसाने प्रभावित अन्य भागांतील मदत व बचावकार्याची माहिती घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
शिंदे यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या जनसंपर्क विभागाने दिली.