नवी दिल्ली : सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्या भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १४ झाली आहे. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने बुधवारी याबाबत माहिती दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आणखी एका भारतीय नागरिकाचा अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या दोन झाली आहे.
सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (जीएसीए) माहितीनुसार, या घटनेत सुरुवातीला १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३०९ जण जखमी झाले होते. रियाधमधील भारतीय दूतावासाने समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर पोस्ट करून या मृत्यूची पुष्टी केली. तसेच मृताच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या.दूतावासाने म्हटले की, अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही कळवत आहोत की, १० ऑक्टोबर रोजी रियाध विमानतळावर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका भारतीय नागरिकाचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. दूतावास सुरुवातीपासूनच संबंधित कुटुंबीयांच्या पाठीशी उभा असून, यापुढेही त्यांना सर्वतोपरी मदत करत राहील. मृताच्या कुटुंबीयांचे आणि मित्रपरिवाराचे आम्ही मनापासून सांत्वन करतो, असेही दूतावासाने म्हटले आहे.
मृत व्यक्तीचे पार्थिव भारतात पाठवण्याची कुटुंबीयांची इच्छा असल्यास त्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच कुटुंबीयांच्या इच्छेनुसार रियाधमध्येच अंत्यसंस्कार करायचे असल्यास त्यासाठीही सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही दूतावासाने दिली आहे.दरम्यान, यापूर्वीही या हल्ल्यात जखमी झालेल्या एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी भारतीय दूतावासाने केली होती. मोहम्मद युसूफ अली असे पहिल्या मृत भारतीय नागरिकाचे नाव होते. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रियाधमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भारताचे राजदूत आणि दूतावासातील अधिकारी उपस्थित होते.