‘फेसबुक लाईव्ह नव्हे, फेस टू फेस’ कामाचा मंत्र
मुंबई : राजकारणातील पद आणि जबाबदाऱ्या बदलल्या तरी सामान्य माणसाशी असलेला थेट संपर्क आणि कार्यकर्त्याची भूमिका कायम असल्याचा संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ‘कॉमन मॅन सीएम’पासून ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’पर्यंतच्या आपल्या राजकीय ओळखीची मांडणी केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ‘फेसबुक लाईव्ह नव्हे, फेस टू फेस’ हा आपल्या कामाचा मंत्र असल्याचे सांगताना शिंदे यांनी रात्री दोन-तीन वाजेपर्यंत नागरिकांशी संवाद साधण्यापासून प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यापर्यंतची कार्यपद्धती स्पष्ट केली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या संस्कारातून ही कार्यशैली विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले.
पाहलगाम संकटाच्या वेळी औपचारिक निर्णयाची वाट न पाहता महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी पाच विमानांची व्यवस्था केल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. ‘आम्ही पळून जाणाऱ्यांपैकी नाही, लोकांना परत आणण्यासाठी जाणाऱ्यांपैकी आहोत,’ हा संदेश त्यांनी दिला. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दाही त्यांनी मांडला. केंद्राकडे मदतीची मागणी, एनडीआरएफच्या मदतीतील बदल आणि राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा उल्लेख करताना शेतकरी प्रश्नात राजकारणापेक्षा मदतीला प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमपीएससीसह युवकांच्या प्रश्नांवर आंदोलन हा लोकशाहीचा अधिकार असल्याचे मान्य करताना राजकीय पक्षांनी युवकांच्या आंदोलनाचा वापर करू नये, असे शिंदे म्हणाले. मराठा आंदोलनाच्या वेळी प्रत्यक्ष आंदोलकांशी संवाद साधल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मतदार यादी आणि ‘व्होट चोरी’च्या आरोपांच्या राजकीय चर्चेवरही संवाद झाला. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनावरही शिंदे यांनी भाष्य केले. आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे; मात्र सीजेपीच्या आंदोलनाचा काही राजकीय पक्षांकडून राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांच्या प्रश्नांवरून आंदोलन उभे राहणे वेगळे आणि त्यामागे राजकीय शक्तींनी आपला अजेंडा पुढे रेटणे वेगळे, असे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनातील राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंक, मेट्रो, कारशेड, बोरीवली-ठाणे बोगदा, भाईंदर-विरार, वांद्रे-वर्सोवा आणि ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गासह विविध प्रकल्पांचा उल्लेख करत शिंदे यांनी कनेक्टिव्हिटीला विकासाचा आधार सांगितले. नवी मुंबई विमानतळाभोवती एरोसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, जेएनपीटी, लॉजिस्टिक्स आणि ग्रीनफिल्ड कनेक्टिव्हिटी विकसित करण्याची भूमिका त्यांनी मांडली. महालक्ष्मी रेसकोर्सची सुमारे १२५ एकर आणि कोस्टल रोडलगतची सुमारे १५० एकर जागा एकत्र करून सुमारे ३०० एकरांचे सेंट्रल पार्क उभारण्याची संकल्पनाही त्यांनी सांगितली; त्यात रिअल इस्टेटचा हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत टीम म्हणून काम करत असल्याचे सांगत महायुतीतील समन्वयावर शिंदे यांनी भर दिला. २०१४ पूर्वी आणि नंतरच्या विकासाची तुलना, केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारा निधी, शिवसेनेच्या २५ वर्षांच्या निमित्ताने सेवा संकल्प तसेच मोदी-शिंदे यांच्या राजकीय प्रतिमांवरील चर्चेलाही त्यांनी उत्तर दिले. शिवसेनेच्या वैधतेबाबत ६० आमदारांचा जनादेश आणि अंतिम निर्णय जनता घेत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत मात्र ‘भविष्य सांगेल’ असे उत्तर देत त्यांनी विषय खुला ठेवला. एकूणच, कॉन्क्लेव्हमधून ‘पद ही भूमिका; कार्यकर्ता ही ओळख आणि कॉमन मॅनशी कनेक्ट हीच ताकद’ असा राजकीय संदेश पुढे आला.