मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेत सदस्यसंख्येत वाढ होणार आहे.
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम : निवडणुकीची अधिसूचना- २५ मे, अर्ज भरण्याची शेवटची तारीख- १ जून, उमेदवारी अर्जांची छाननी- २ जून, अर्ज माघारीची मुदत- ४ जून मतदान- १८ जून (स.८ ते दु.४) मतमोजणी- २२ जून
कार्यकाळ संपलेल्या सदस्यांची नावे : सोलापूर: प्रशांत परिचारक, अहमदनगर: अरुणकाका जगताप, ठाणे: रवींद्र फाटक, जळगाव: चंदूभाई पटेल, सांगली-सातारा: मोहनराव कदम, नांदेड: अमरनाथ राजूरकर, यवतमाळ: दुष्यंत चतुर्वेदी, पुणे: अनिल भोसले, भंडारा-गोंदिया: डॉ. परिणय फुके, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत तटकरे, नाशिक: नरेंद्र दराडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: रामदास आबिटकर, अमरावती: प्रवीण पोटे, धाराशिव-लातूर-बीड: सुरेश धस, परभणी-हिंगोली: विप्लव गोपीकिसन बजोरिया, औरंगाबाद-जालना: अंबादास दानवे, आदर्श आचारसंहिता लागू
निवडणूक आयोगाच्या या घोषणेसोबतच संबंधित मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता’ (Model Code of Conduct) तातडीने लागू करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्या संख्याबळावर या जागांचे भवितव्य ठरणार असल्याने, आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी आणि राजकीय गणितांना सुरुवात झाली आहे.