राज्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग; राज्यसभेच्या २४ जागांसाठी १८ जूनला मतदान

0

निवडणूक आयोगाने जाहीर केला निवडणूक कार्यक्रम

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने १० राज्यांतील २४ राज्यसभा जागांसाठी आज, शुक्रवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार या जागांसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. या घोषणेनंतर संबंधित राज्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. ज्या राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम यांचा समावेश आहे. यापैकी आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार आहे.

कोणत्या राज्यात किती जागांसाठी निवडणूक : आंध्र प्रदेश – ४ जागा, गुजरात – ४ जागा, कर्नाटक – ४ जागा, मध्य प्रदेश – ३ जागा, राजस्थान – ३ जागा, झारखंड – २ जागा, मणिपूर –१ जागा, मेघालय – १ जागा, अरुणाचल प्रदेश – १ जागा, मिझोरम – १ जागा

निवडणूक आयोगाने सांगितले की, राज्यसभेतील विद्यमान खासदार २१ जून ते १९ जुलै २०२६ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना निवृत्त होत आहेत. त्यामुळे या जागांसाठी निवडणुका घेण्यात येत आहेत.

या निवडणुकांमुळे राज्यसभेतील अनेक प्रमुख नेत्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय राजस्थानमधील राज्यसभा खासदार राजेंद्र गहलोत, नीरज डांगी आणि रवनीत सिंह यांच्या जागाही रिक्त होणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम : १ जून २०२६ – अधिसूचना जारी, ८ जून २०२६– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, ९ जून २०२६– अर्जांची छाननी, ११ जून २०२६– उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख, १८ जून २०२६ – मतदान आणि मतमोजणी

मतदानासाठी विशेष सूचना : निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेबाबत विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मतदानाच्या वेळी केवळ रिटर्निंग ऑफिसरकडून उपलब्ध करून दिलेले जांभळ्या रंगाचे विशेष स्केच पेन वापरणे बंधनकारक असेल. इतर कोणतेही पेन वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक मतदान सुनिश्चित करण्यासाठी आयोगाकडून निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech