रेल्वेच्या जमिनीवर ५ वर्षात ३२ टक्क्यांनी वाढले अतिक्रमण

0

आरटीआय अंतर्गत पुढे आली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ अखेर रेल्वेच्या १,०६८. ५४ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. ही जमीन इतकी मोठी आहे की, त्यावर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमसारखी तब्बल ४२ स्टेडियम उभारता येऊ शकतात.रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, फिफाच्या निकषांनुसार सुमारे १३९६ फुटबॉल स्टेडियम उभारण्यासाठीही ही जमीन पुरेशी आहे.

आरटीआयद्वारे मागील २५ वर्षांची माहिती मागविण्यात आली होती. मात्र, रेल्वे बोर्डाने केवळ मागील ५ वर्षांची आकडेवारी उपलब्ध करून दिली.आकडेवारीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात रेल्वेच्या ८१०.३१ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण होते. त्यानंतर २०२१-२२ मध्ये हे क्षेत्र घटून ७८२.८१ हेक्टर झाले. मात्र, पुढील वर्षांमध्ये पुन्हा अतिक्रमणात मोठी वाढ झाली. २०२३-२४ मध्ये अतिक्रमित क्षेत्र १,०७८.५५ हेक्टर इतके झाले, तर २०२४-२५ मध्ये त्यात किंचित घट होऊन १.०६८.५४ हेक्टर इतकी नोंद झाली.

या ५ वर्षांच्या कालावधीत रेल्वेच्या अतिक्रमित जमिनीचे क्षेत्रफळ सुमारे ३२ टक्क्यांनी वाढले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. रेल्वे बोर्डाने दिलेली ही माहिती २७ मार्च २०२६ रोजी संसदेत केंद्र सरकारने सादर केलेल्या आकडेवारीशी सुसंगत आहे.संसदेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ पर्यंत भारतीय रेल्वेकडे ४.९९ लाख हेक्टर जमीन होती. त्यापैकी सुमारे १०६८ हेक्टर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. रेल्वे बोर्डाने आरटीआय अंतर्गत दिलेल्या ताज्या माहितीतही याच बाबीची पुष्टी झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech