महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे आवाहन
नाशिक : कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष जयदीप भदाणे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली कांद्याची विक्री करू नये जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनाला आता शेतकरी कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे
दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातून देशातील प्रमुख महानगरांमध्ये कांद्याचा पुरवठा वाढविल्याने गत सप्ताहात क्विंटलला ५०० रुपयांनी घसरलेला कांदा चालू सप्ताहात मात्र पूर्वपातळी गाठत आहे. सरासरी प्रति क्विंटल भाव साडेचार हजार रुपयांवर पोहोचले असून, सरकारच्या व्यूहरचनेला शह देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना मैदानात उतरली आहे. नवीन खरीप कांदा एक ते दीड महिना विलंबाने बाजारात येईल. तोपर्यंत बाजारात तुटवडा राहणार असून, शेतकऱ्यांनी चाळीतील शिल्लक उन्हाळ कांदा विकण्याची घाई करू नये. टप्प्याटप्प्याने माल बाजारात नेऊन अधिकतम नफा पक्का करावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
जवळपास दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मध्यंतरी कांद्याच्या भावाने चार हजार रुपयांचा टप्पा गाठला होता.किरकोळ बाजारात दरात ५९ टक्के वाढ झाल्यामुळे सरकारी यंत्रणा कार्यप्रवण झाल्या. नाफेड व एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या राखीव साठ्यातील काही माल दिल्ली व चेन्नईला पाठवून ३५ रुपये किलो (३५०० रुपये क्विंटल) दराने उपलब्ध करून देण्यात आला. या घटनाक्रमामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील, म्हणजेच घाऊक बाजारातील, दर ४०० ते ५०० रुपयांनी घसरले होते. दरवर्षीच्या तुलनेत सरकारकडे कमी राखीव साठा असल्याने आणि चाळीतील कांदा खराब होऊ लागल्याने त्याच्या उपलब्धतेवरही मर्यादा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शेतकऱ्यांना सजग करीत पुढील तीन ते चार महिने काय स्थिती राहील, याकडे लक्ष वेधले आहे. जुन्या व नवीन कांद्याला यावर्षी १०० टक्के चांगला भाव मिळणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
पावसाअभावी खरीप कांद्याची लागवड रेंगाळली. नाशिक जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपैकी आतापर्यंत अवघ्या ५०० हेक्टरवर (केवळ दोन टक्के) लागवड झाली आहे. परिणामी, दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यात बाजारात येणारा नवीन खरीप कांदा थेट नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला बाजारात येईल. चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यापैकी ६० ते ६५ टक्के साठा आधीच संपुष्टात आला आहे. उर्वरित साठा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतच पुरेल, असा अंदाज आहे. नवीन खरीप व रांगडा कांदा बाजारात येण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे त्यालाही यावर्षी विक्रमी दर मिळण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादकांनी पिकाचे योग्य नियोजन, खत-पाणी व्यवस्थापनावर लक्ष देऊन चांगल्या दर्जाचा माल काढण्यावर मुख्यत्वे भर द्यावा. कारण, चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारात नेहमीच पसंती आणि चढा भाव मिळतो.
उन्हाळ कांदा विक्रीचे सूत्र
शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना चाळीतील कांदा जागेवर विकू नये. कांदा नेहमी बाजार समितीत नेऊन लिलावातच विक्री करावा. एकदम सर्व कांदा बाजारात न आणता, कांदा द्यायचा झाल्यास एका वेळी २० ते २५ गोण्यांपेक्षा जास्त कांदा विक्री करू नका. जोपर्यंत आपण पिकवलेला कांदा ग्राहकाच्या घरापर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याचे आपण खरे मालक आहोत. संयम ठेवून दर्जेदार कांदा पिकवा, टप्प्याटप्याने विक्री करा आणि यावर्षी आपल्या कष्टाचा पूर्ण मोबदला मिळवून घ्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केले आहे.