राम मंदिर कथित गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी केले होते आंदोलन
नवी दिल्ली : संसद परिसरात राम मंदिर देणगी कथित गैरव्यवहार प्रकरणावरून करण्यात आलेल्या विरोध प्रदर्शनानंतर बिहारच्या पूर्णिया येथील खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्या विरोधात दिल्लीतील जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत धार्मिक भावना दुखावणे आणि धार्मिक प्रतीकांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सूर्य मैथिल यांनी ही तक्रार दाखल केली असून, आंदोलनादरम्यान भगवान रामलल्ला यांच्या प्रतिमेचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनावेळी रामलल्ला यांचे छायाचित्र पायाखाली ठेवण्यात आले, ज्यामुळे सनातन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या.तक्रारदाराने असा दावा केला आहे की, या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव, अवधेश प्रसाद तसेच इंडि आघाडीतील इतर काही खासदारांचा पाठिंबा होता. संसद परिसरात शुक्रवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी कथित राम मंदिर देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून प्रतीकात्मक आंदोलन केले. आंदोलनादरम्यान “चंदा चोर, गद्दी छोड़”, “जवाब तुमको देना होगा” आणि “अमित शाह, सदन में आओ” अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.
या आंदोलनात पप्पू यादव भगवे वस्त्र परिधान करून मंदिरातील पुजाऱ्याच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या हातात भगवान राम यांचे छायाचित्र होते. त्यांनी देणगी संकलनाचे प्रतीकात्मक दृश्य सादर केले. आंदोलनात सहभागी इतर खासदारांनी भाविकांची भूमिका निभावत देणगीपेटीत पैसे टाकल्याचे दाखवले, तर पुजाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या पप्पू यादव यांनी तेच पैसे प्रतीकात्मकरीत्या स्वतःच्या खिशात ठेवताना दाखवले. त्यानंतर भाविकाच्या भूमिकेत असलेल्या समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने या कथित गैरव्यवहारावर आक्षेप घेतला. संपूर्ण आंदोलन नुक्कड नाटकाच्या स्वरूपात सादर करण्यात आले.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, संसद परिसरात अशा प्रकारच्या वेशभूषाधारित आणि नाट्यमय आंदोलनांबाबत लोकसभा सचिवालयाने कठोर भूमिका घेतली आहे. संसद परिसरात अशा प्रकारच्या आंदोलनांना परवानगी दिली जाणार नसल्याचे सचिवालयाने स्पष्ट केले आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली असून, विद्यमान नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी सांगितले की, हे आंदोलन अयोध्येतील देणगी व्यवहारांबाबत करण्यात आलेल्या आरोपांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाविकांकडून देणगी स्वीकारण्यात आली; मात्र त्याची पावती देण्यात आली नाही. तसेच संबंधित सीसीटी फुटेज हटवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी विरोधकांच्या आंदोलनावर तीव्र टीका केली. अशा कृतींमुळे सनातन धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मतांच्या राजकारणासाठी सनातन धर्माचा अपमान करत असल्याचेही त्यांनी म्हटले. अशा प्रकारच्या कृत्यांना सनातन समाज कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.