स्मार्ट मीटरनंतर व्होल्टेजचा चढ-उतार; कोपरीत आगीच्या घटनांनी वीज वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

0

ठाणे : कोपरी परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये वीजपुरवठ्यातील व्होल्टेजमध्ये चढ-उतार होत असल्याच्या तक्रारी असतानाच, गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना घडल्याने वीज वितरण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पत्रकार सोसायटीच्या मीटर बॉक्सला बुधवारी मध्यरात्री आग लागण्याची घटना घडल्यानंतर या प्रश्नाला पुन्हा वाचा फुटली आहे.

कोपरीतील पत्रकार सोसायटीमध्ये स्मार्ट मीटर बसविल्यानंतर काही फ्लॅटमध्ये वीजपुरवठ्याच्या व्होल्टेजमध्ये वारंवार चढ-उतार होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागली. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, कोपरी परिसरातील पीपल्स सोसायटी एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेतील सर्व्हर रूममध्येही दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे वीजपुरवठ्यातील चढ-उतार आणि विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

परिसरातील काही सोसायट्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजपुरवठ्यातील व्होल्टेजमध्ये चढ-उतार होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेसह मीटर बॉक्स, केबल, जोडणी आणि संपूर्ण वीज वितरण यंत्रणेची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे.

आगीच्या घटनांचे नेमके कारण शॉर्ट सर्किट, ओव्हरलोडिंग, वायरिंगमधील दोष किंवा व्होल्टेजमधील चढ-उतार यापैकी काय आहे, याचा अधिकृत तांत्रिक अहवालातून उलगडा होणे आवश्यक आहे. वीज वितरण कंपनीने कोपरी परिसरातील अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र तांत्रिक तपासणी करावी आणि रहिवाशांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजपुरवठ्याबाबत तक्रारी वाढल्या असल्यास त्याची कारणमीमांसा करून दोष आढळल्यास तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीकडून या घटनांबाबत स्पष्ट भूमिका आणि तांत्रिक तपासणीचा अहवाल अपेक्षित आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech