मुरुडमध्ये आठ कोटींच्या बांबू क्लस्टरचे उद्या भूमिपूजन

0

रायगड :  मुरुड तालुक्यातील शिरगाव येथे आठ कोटी आठ लाख रुपये खर्चाच्या बांबू क्लस्टर सामूहिक सुविधा केंद्राचे भूमिपूजन गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते हा सोहळा होणार असून, प्रकल्पामुळे जिल्ह्यातील बांबू उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासह पाच ते सहा हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीची अपेक्षा आहे.

उद्योग आयुक्तालयांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित राहणार आहेत. बांबू क्लस्टरच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला राज्यस्तरीय सुकाणू समितीने १३ मे २०२६ रोजी मंजुरी दिली आहे. या सामूहिक सुविधा केंद्रात बांबू कापणे, पट्ट्या तयार करणे, गाठी काढणे आणि पॉलिश करणे यांसारख्या प्रक्रिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून करता येणार आहेत. सध्या क्लस्टरमध्ये ८८ उद्योगघटक सहभागी असून, या सुविधांचा लाभ सुमारे ३०० ते ४०० उद्योगघटकांना मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यात टोपल्या, सुपा, बास्केट, मोबाईल स्टँड, खुर्च्या, टेबल, भेटवस्तू आणि शोभेच्या वस्तू यांसारखी विविध बांबू उत्पादने तयार केली जातात. जिल्ह्यातील तीन ते चार हजार बांबू कारागिरांना या प्रकल्पाचा लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादकता आणि बाजारपेठेतील स्पर्धाक्षमता वाढविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील उद्योजक, बांबू कारागीर आणि नवउद्योजकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उपआयुक्त जी. एस. हरळय्या यांनी केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech