आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवाद आवश्यक – मुख्यमंत्री

0

मुंबई : जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी काही सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. समान मूल्यांचा शोध घेत, सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढविणे आजची गरज आहे. केवळ आर्थिक सहकार्य नव्हे, तर मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादातूनच अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ (GIF) च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई येथील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनेस्का कोस्टा कौटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन ती, दक्षिण आफ्रिकाचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याच्या काळात जग अनेक स्तरांवर विखुरलेले असून जागतिक व्यवस्था विविध अर्थांनी असंतुलित झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत विविध देशांनी एकत्र येण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्कृती ,मते आणि विचारधारा भिन्न असल्या तरी संवादाच्या माध्यमातून समान मूल्यांवर आधारित परस्पर समज वाढविणे शक्य आहे.

केवळ आर्थिक संबंध आणि व्यापाराच्या माध्यमातून जग अधिक चांगले होऊ शकत नाही. त्यासाठी मानवी मूल्यांवर आधारित संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्परांच्या अनुभवांतून शिकण्याची प्रक्रिया आवश्यक आहे. विविध देशांतील नागरिक, राजकीय नेते, राजनैतिक प्रतिनिधी, विचारवंत तसेच उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील नेतृत्वाने अशा व्यासपीठांवर एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech