रायपूर : एम्स रायपूरची वाढ ही छत्तीसगडमध्ये होत असलेल्या उल्लेखनीय परिवर्तनाचे द्योतक आहे, असे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. उपराष्ट्रपती बुधावरी रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तिसऱ्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून पदवीधर विद्यार्थ्यांना आरोग्य, विश्वास आणि जीवन यादृष्टीने भारताच्या जनतेची सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की दीक्षांत समारंभ हा केवळ उत्सवाचा क्षण नसून तो जबाबदारीचाही क्षण आहे. “आज तुम्ही तुमच्या पदव्या स्वीकारत आहात आणि उद्या तुमच्यावर त्याहूनही अधिक मौल्यवान अशी जबाबदारी सोपवली जाईल – ती म्हणजे भारताच्या जनतेचे आरोग्य, विश्वास आणि जीवन,” असे ते म्हणाले. एम्स रायपूरने २०१२ मध्ये स्थापन झाल्यापासून विशेषतः मध्य भारतातील आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांमधील प्रादेशिक विषमता दूर करण्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर उपराष्ट्रपतींनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की अत्यंत कमी कालावधीत ही संस्था छत्तीसगड आणि शेजारील राज्यांसह ग्रामीण आणि आदिवासी समुदायांना सेवा देणारी एक प्रमुख तृतीय-स्तरीय आरोग्यसेवा संस्था म्हणून विकसित झाली आहे.
छत्तीसगडच्या काही भागांना अनेक दशकांपासून भेडसावणाऱ्या आव्हानांचा संदर्भ देत सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की अवघड भौगोलिक परिस्थिती, अपुरी दळणवळण व्यवस्था आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी कारवायांनी विकासात गंभीर अडथळे निर्माण केले आहेत. अनेक दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये भीती आणि हिंसाचारामुळे रस्ते, शाळा आणि रुग्णालयांच्या विकासात अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे समुदायांना अत्यावश्यक सेवा मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपराष्ट्रपती म्हणाले की छत्तीसगड आज आपल्या भूतकाळाच्या छायेतून बाहेर पडून समृद्धी, विकास आणि प्रगतीच्या नव्या पर्वाचा साक्षीदार होत आहे. त्यांनी या परिवर्तनाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णायक नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा धोरणात्मक निर्धार आणि मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या वचनबद्ध नेतृत्वाला दिले.
दशकांपासूनचे नक्षलवादाचे संकट आता संपुष्टात आले असून, कधीकाळी हिंसाचारासाठी ओळखले जाणारे प्रदेश आता रस्ते, शाळा, रुग्णालये, दळणवळणीय जोडणी, गुंतवणूक आणि संधींसाठी ओळखले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हे घडून आलेले परिवर्तन म्हणजे दृढ राजकीय इच्छाशक्ती, सुरक्षेचे खंबीर धोरण आणि विकासाभिमुख शासन यामुळे काय फरक पडू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण आहे, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी रायपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची प्रशंसा केली. ही संस्था नव्या छत्तीसगडचे एक उत्कृष्ट प्रतीक बनली आहे. छत्तीसगड आता भीती आणि दडपणाच्या युगाकडून शांतता, प्रगती आणि संधींच्या युगाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे असे त्यांनी सांगितले.
रायपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने प्रगत आरोग्य सेवा आणि अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचीही त्यांनी प्रशंसा केली. या संस्थेच्या यशामधून या प्रदेशात प्रगत वैद्यकीय उपचार वेगाने उपलब्ध होत असल्याची प्रचिती येते असे त्यांनी सांगितले. छत्तीसगडमधील पहिले स्वॅप किडनी प्रत्यारोपण (Swap Kidney Transplant), मूत्रपिंड प्रत्यारोपणातील 95% पेक्षा जास्त यश, मूत्रपिंड आणि बुबुळ प्रत्यारोपण तसेच कान प्रत्यारोपण यांसारख्या महत्त्वाच्या कामगिरीचाही उल्लेख त्यांनी केला. यासोबतच हृदय प्रत्यारोपण कार्यक्रमाला मिळालेली मंजुरी हा या यशदायी वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ते म्हणाले. विकसित भारताचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी समतोल विकासाची गरजही त्यांनी अधोरेखित केली. जेव्हा प्रत्येक राज्य, जिल्हा आणि गाव विकसित होईल, तेव्हाच हे ध्येय पूर्ण होऊ शकते, ही बाब त्यांनी नमूद केली. उच्च शिक्षणाची सोय सर्वांना उपलब्ध असणे हा विकसित भारताच्या ध्येयाचा मुख्य गाभा आहे. त्या दृष्टीनेच गेल्या १२ वर्षांमध्ये उच्च शिक्षणाचा झालेला विस्तार अत्यंत कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
उच्च शिक्षण क्षेत्रातील महिलांच्या सहभागात लक्षणीय वाढ झाली असल्याची बाबही उपराष्ट्रपतींनी नमूद केली. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या महिलांचे प्रमाण २०१४-१५ मधे १.५७ कोटी इतके होते, त्यात ४२.२% इतकी मोठी वाढ होऊन २०२३-२४ मध्ये हे प्रमाण २.२४ कोटींपर्यंत पोहोचले असल्याची बाब त्यांनी नमूद केली. रायपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पदवीदान समारंभातही पदवी मिळवणाऱ्यांमध्ये ३७६ महिला आणि ३१३ पुरुष असल्याची आकडेवारीही त्यांनी मांडली. यावेळी सी. पी. राधाकृष्णन यांनी, युवा वर्गाला, अमली पदार्थांना नेहमी ठामपणे नाही म्हणावे असा आवाहनपूर्वक सल्लाही दिला. तंत्रज्ञान अखेरच्या नागरिकापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक युवा भारतीयाला चांगल्या भविष्याची आकांक्षा असेल, असा भारत घडवण्यात युवा वर्गाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानातून प्रत्यक्षात रुग्ण बरा होईल असे उपचार होतील, त्यांनी केलेल्या संशोधनातून नवोन्मेष साकारला जाईल नवनवीन प्रयोग करेल आणि या विद्यार्थ्यांची सेवा इतरांना प्रेरित करेल अशी कामना व्यक्त करत त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.