भारताचे जीएसटी महसूल संकलन एप्रिलमध्ये २.४३ लाख कोटी रुपयांवर

0

नवी दिल्ली : देशाचा सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलन एप्रिल महिन्यात ८.७ टक्क्यांनी वाढून सुमारे २.४३ लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. हा आकडा एप्रिल २०२५ मधील २.२३ लाख कोटी रुपयांच्या विक्रमापेक्षा अधिक आहे. जीएसटी महानिदेशालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात जीएसटी महसूल संकलन ८.७ टक्क्यांनी वाढून २,४२,७०२ कोटी रुपये (२.४३ लाख कोटी रुपये) या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन २.२३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नोंदवले गेले होते.

जीएसटी संकलनातील ही वाढ मुख्यत्वे आयातीवरील करांमध्ये २५.८ टक्क्यांची मोठी वाढ आणि मजबूत देशांतर्गत खप यामुळे झाली आहे. आकडेवारीनुसार, या कालावधीत देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा सकल महसूल ४.३ टक्क्यांनी वाढून १.८५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. आयातीमधून मिळणाऱ्या जीएसटी संकलनात २५.८ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असून, तो ५७,५८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात ३१,७९३ कोटी रुपयांचे परतावे (रिफंड) देण्यात आले, जे १९.३ टक्क्यांनी अधिक आहेत. परतावे समायोजित केल्यानंतर एप्रिल महिन्यातील निव्वळ जीएसटी महसूल संकलन ७.३ टक्क्यांनी वाढून सुमारे २.११ लाख कोटी रुपये झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech