दशावतार कलेच्या संवर्धनासाठी कलाकारांच्या मागण्यांवर विभागीय समन्वय बैठक घ्या……..!

0

मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे विभागाला निर्देश

(अनंत नलावडे)
मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून पात्र दशावतार कलापथकांना अनुदान दिले जाते.तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपयांचे मानधनही उपलब्ध आहे.मात्र, दशावतार नाट्यमंडळाच्या मागण्या ह्या विविध विभागांशी संबंधित असल्याने या मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर समन्वय बैठक घेण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेच्या जतन, संवर्धन आणि कलाकारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे बैठक पार पडली.या बैठकीस आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार मंडळांचे प्रतिनिधी, कलावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड.शेलार म्हणाले की, कोकणातील दशावतार महोत्सवांची संख्या वाढवून मुंबई आणि ठाणे येथेही शासनाच्या माध्यमातून विशेष दशावतार महोत्सव आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर दशावतार विषयक प्रशिक्षण कार्यशाळा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक संस्थांशी समन्वय साधण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्रातील लोककलांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याबाबत बालभारतीला पत्र पाठविण्याचेही ॲड.शेलार यांनी कलाकारांच्या प्रवास सवलतीसाठी परिवहन विभागाशीही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दशावतार कलाकारांच्या वाहनांवरील करसवलत, विश्रांतीगृहे, मुंबई-ठाणे परिसरात निवास व्यवस्था, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीच्या मागण्यांवरही सकारात्मक विचार करण्यात येईल,असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.

कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून ॲड.शेलार यांनी दशावतार कलाकारांची अधिकृत निर्देशिका (डिरेक्टरी) तयार करण्याच्या प्रस्तावालाही यावेळी मान्यता दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech