येत नसेल तर मराठी शिका पण महाराष्ट्रात मराठीतच बोललं पाहिजे – भाजप नेते माजी नरेंद्र पवार

0

कामगार दिनानिमित्त आयोजित असंघटित बांधकाम कामगार मेळाव्यात बोलताना केले आवाहन

कल्याण : महाराष्ट्र राज्य घडण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुति दिली आहे. त्यामुळे इकडे राहणाऱ्या बाहेरील व्यक्तींना ही भाषा येत नसेल तर त्यांनी ती शिकावी. पण महाराष्ट्रात मराठीच भाषा बोलली पाहिजे असे प्रतिपादन भाजपा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे. कामगार दिनाच्या निमित्ताने टिटवाळा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बल्याणी येथे भव्य असंघटित बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून नरेंद्र पवार यांनी मराठी भाषेच्या जतन आणि वापराचा मुद्दा ठळकपणे मांडला.

या मेळाव्यात बोलताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा समजून घेतली पाहिजे आणि मराठीत संवाद साधला पाहिजे. “हा महाराष्ट्र घडवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा आदर राखणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. विशेषतः परप्रांतीय कामगारांना उद्देशून त्यांनी आवाहन केले की, “महाराष्ट्रात काम करत असताना मराठी भाषा शिकणे गरजेचे आहे. स्थानिक संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे.”

तसेच “नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी आपण दक्षिणेतील केरळ राज्यामध्ये प्रचारासाठी गेलो होतो. त्यावेळी तेथील स्थानिक मल्याळम भाषा शिकण्याचा आपण प्रयत्न केला. मग तुम्ही तर महाराष्ट्रात राहता, त्यामुळे तुम्हाला मराठी आलीच पाहिजे,” अशा शब्दांत पवार उपस्थित कामगार वर्गाला मराठी बोलण्याचे आवाहन केले.

या भव्य मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेतर्फे आणि समाजसेवक संदीप गायकवाड आणि हेमंत गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच कामगारांच्या हक्क, सुरक्षा आणि कल्याणाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह कल्याणचे प्रांताधिकारी विश्वास गुजर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगांवकर,वैभव भोईर, नगरसेवक मुकुंद कोट, स्थानिक नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड, माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी, माजी नगरसेविका शारदा बबन गायकवाड, लक्ष्मण तरे, विजय पाटील, संतोष दळवी, सुबराव खराडे,नाना पवार,गौतम बरडे, विवेक शिंदे, प्रशांत सोनारे, निलेश तिवारी, श्रावण पाटील, सिद्धार्थ गोडांबे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच कामगार वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech