महागाई दर ८.३० टक्क्यांवर, मार्चच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढ

0

नवी दिल्ली : इंधन, वीज आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे एप्रिल महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर झपाट्याने वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला. गेल्या ४२ महिन्यांतील हा उच्चांकी दर आहे. मार्चमध्ये हा दर ३.८८ टक्के होता. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली. इंधन आणि वीज गटातील महागाई दर एप्रिलमध्ये २४.७१ टक्क्यांवर गेला आहे. मार्चमध्ये तो केवळ १.०५ टक्के होता. कच्चे पेट्रोलियम क्षेत्रातील महागाई ८८.०६ टक्क्यांवर पोहोचली असून मागील महिन्यात ती ५१.५ टक्के होती.

अन्नधान्य गटातील महागाई दर एप्रिलमध्ये १.९८ टक्के राहिला, जो मार्चमध्ये १.९० टक्के होता. बिगर-अन्न वस्तूंमधील महागाई १२.१८ टक्क्यांवर गेली असून मार्चमध्ये ती ११.५ टक्के होती. पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील प्रभावी नाकेबंदीमुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम घाऊक महागाईवर झाल्याचे मानले जात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, अन्य उत्पादन क्षेत्रे आणि बिगर-अन्न वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे एप्रिलमधील महागाई दरात वाढ झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech