पाकिस्तानच्या युद्धविरामाच्या विनंतीला भारताचा जाणीवपूर्वक विलंबित प्रतिसाद – अनिल चौहान

0

नवी दिल्ली : निवृत्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, १० मे २०२५ रोजी सकाळी पाकिस्तानने युद्धविरामासाठी भारताशी संपर्क साधला होता. मात्र, भारताने जाणीवपूर्वक आपल्या प्रतिसादाला विलंब केला. एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात बोलताना जनरल चौहान यांनी सांगितले की, जनरल चौहान यांच्या म्हणण्यानुसार, १० मे २०२५ च्या सकाळी पाकिस्तानने डीजीएमओ (लष्करी कारवायांचे महासंचालक) हॉटलाइनद्वारे भारताशी संपर्क साधून तातडीने युद्धविरामाची विनंती केली. मात्र, भारताने पाकिस्तानला दुपारपर्यंत प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. यामागचे कारण म्हणजे भारतातर्फे नियोजित केलेल्या लष्करी कारवायांपैकी जवळपास निम्म्या कारवाया अद्याप बाकी होत्या. त्यांनी सांगितले की, आपली लष्करी उद्दिष्टे पूर्ण केल्याशिवाय भारत ऑपरेशन थांबवण्यास तयार नव्हता.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या नियोजन आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या माजी सीडीएस यांनी सांगितले की, पाकिस्तानला वाटत होते की भारतीय तळांवरील त्यांच्या हल्ल्यांनी अपेक्षित परिणाम साधला आहे. तसेच, भारताकडून आणखी मोठ्या लष्करी कारवाईची त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी युद्धविरामाची मागणी केली. जनरल चौहान म्हणाले, “१० मे रोजी पाकिस्तानने चर्चेसाठी भारताला फोन केला, हे माझ्यासाठी सर्वात मोठे आश्चर्य होते. कारण ९ मे रोजी पाकिस्तानकडून अशी भाषा वापरली जात होती की ते ४८ तासांत भारताला धडा शिकवतील.”मात्र, ९ मेच्या रात्रीपासून १० मेच्या दुपारपर्यंत भारताने पाकिस्तानातील ११  लष्करी तळ आणि हवाई तळांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हॅंगर, रडार केंद्रे आणि अनेक लढाऊ विमानांचे मोठे नुकसान झाले.

जनरल चौहान यांनी सांगितले की, या कारवाईचा उद्देश पाकिस्तानमधील कोणतेही लष्करी ठिकाण भारतीय सशस्त्र दलांच्या आवाक्याबाहेर नाही, हा स्पष्ट संदेश देणे हा होता. ते पुढे म्हणाले की, युद्धभूमीवर स्वतःच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या क्षमतांचे वास्तववादी मूल्यमापन अत्यंत महत्त्वाचे असते. भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता पाकिस्तानातील लष्करी तळांवर व्यापक आणि प्रभावी हल्ले करून मोठे नुकसान केले, असेही त्यांनी नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech