चक्क मंत्र्यांच्याच घरचे वीज बिल चौपट..;
विरोधकांना आयते कोलीत…..!
(अनंत नलावडे)
मुंबई : राज्यातील महायुती सरकारने व त्यातही ज्यांच्या हातात ऊर्जामंत्रालयाचीही सूत्रे आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांच्या हिताचा दावा करत संपूर्ण राज्यभरात “स्मार्ट मीटर” ची सुरू केलेल्या अंमलबजावणी वरून आता एका नव्या वादाला आणि राजकीयदृष्ट्याही बुधवारी अधिक गंभीर वळण मिळाल्याचे उघडकीस आले. कारण, याच स्मार्ट मीटरचे उघड समर्थन करणारे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनीच स्वतःच्या घराचे वीज बिल चौपट वाढल्याचा दावा करत महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच जाब विचारला आहे. त्यामुळे सरकारच्या एकंदरीत भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधकांच्या हातातही हा मोठा मुद्दा जाण्याची चिन्हे आहेत.
आज जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “स्मार्ट मीटर” बसवण्यापूर्वी त्यांच्या घराचे मासिक वीज बिल सुमारे ५ हजार रुपये येत होते. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ते थेट २० हजार रुपयांवर गेल्याचा अनुभव त्यांनी जाहीरपणे मांडला. “तुमचे स्मार्ट मीटर आमच्यावर फारच प्रेम करत आहेत, ते जरा सांभाळा,” असा मिश्किल टोलाही त्यांनी याच कार्यक्रमात महावितरण अधिकाऱ्यांनाही लगावला.
मंत्र्यांनी केवळ स्वतःचाच अनुभव सांगितला नाही, तर मतदारसंघातील अनेक ग्राहकही वाढीव वीज बिलांच्या तक्रारी घेऊन येत असल्याचे नमूद करत संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही दिले. ग्राहकांची संमती आणि योग्य प्रक्रिया पाळूनच स्मार्ट मीटर बसवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच गुलाबराव पाटील यांनी स्मार्ट मीटर बाबतच्या अफवा फेटाळून लावत नागरिकांना ते निर्धास्तपणे स्वीकारण्याचे जाहीर आवाहन केले होते. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग होईल, दिवसा वीज वापरावर सवलती मिळतील आणि ग्राहकांचे बिल कमी होईल, असा सरकारचा दावा त्यांनीच पुढे मांडला होता. त्यामुळे आता त्यांच्या अनुभवामुळे एकूणच सरकारच्या दाव्यांचीही विश्वासार्हताच चर्चेत आली आहे.
राजकीय परिणाम काय होऊ शकतात….?
ही घटना केवळ एका मंत्र्याच्या वीज बिलापुरती मर्यादित नाही. राज्यभरात स्मार्ट मीटर विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना यामुळे अधिक बळ मिळू शकते. तसेच विरोधकांच्याही हातात हे आयते कोलीत मिळाले असून विरोधकही अधिक आक्रमकपणे “जे मंत्र्यांच्या घरात घडते, तेच सामान्य नागरिकांच्या घरातही घडत आहे,” असा आरोप करत सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
तरं दुसरीकडे, महावितरण समोरही आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. कारण वाढीव बिलांचे कारण प्रत्यक्ष वीज वापर आहे की मीटरमधील तांत्रिक बिघाड, चुकीचे रीडिंग किंवा बिलिंग प्रक्रियेतील त्रुटी, याबाबत पारदर्शक स्पष्टीकरण देणे आता सरकारसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.
त्यामुळे या सर्व धक्कादायक प्रकारावरून जर काही निष्कर्ष काढायचा झाल्यास स्मार्ट मीटर हा सरकारच्या ऊर्जा सुधारणांमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला, तरी मंत्र्यांच्याच घरचे वीज बिल चौपट वाढल्याचा दावा समोर आल्याने या योजनेच्या एकूणच विश्वासार्हतेवरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारनेही याची गंभीर दखल घेत तातडीने वस्तुनिष्ठ चौकशी करून निष्कर्ष जाहीर केले नाहीत, तर स्मार्ट मीटरचा मुद्दा येत्या काळात राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेचा आणि सरकारसाठीही अडचणीचा विषय ठरू शकतो हे मात्र नक्की…..