नवी दिल्ली : फ्लाय दुबईच्या विमानातील मोठी दुर्घटना टाळणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल सन्मानित करणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांनी गुरुवारी घोषणा केली की, कॅप्टन मच्छर यांना नागरी शौर्यासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सध्या स्मित मच्छर रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जेरुसलेम येथे सहा इस्रायली नागरिकांना हा पुरस्कार प्रदान करताना हर्झोग यांनी कॅप्टन मच्छर यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आज आम्ही ज्या इस्रायली वीरांचा सन्मान करत आहोत, त्यांच्यासोबतच भारताचे कॅप्टन स्मित मच्छर लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या शौर्याने, धैर्याने आणि व्यावसायिक कौशल्याने मोठी दुर्घटना टाळण्यास मदत केली. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर इस्रायलच्या जनतेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचा मला सन्मान मिळेल.
गेल्या आठवड्यात तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या एफझेड १०७३ या विमानात सहवैमानिक हमाम अल-हम्मामी (ओमानी नागरिक) याने कॅप्टन मच्छर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॅप्टन मच्छर यांच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे विमानातील १८० जणांचे प्राण वाचले. अखेर सौदी अरेबियात विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही कॅप्टन मच्छर यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी मच्छर यांना इस्रायल, भारत आणि संपूर्ण जगाचे हिरो असे संबोधले होते. तसेच, इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांना निमंत्रणही दिले होते.७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी या पुरस्काराची सुरुवात केली होती. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी असामान्य धैर्य आणि शौर्य दाखवणाऱ्या नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो.