रायगड : ऐतिहासिक जंजिरा किल्ला परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत लाटरोधक भिंत व जेट्टी बांधकाम प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. सागरमाला योजनेअंतर्गत राज्य हिस्सा निधीतून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे १११.४१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत जवळपास १०७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरण (SEIAA) यांच्याकडून प्रकल्पास पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली असून सुमारे २५० मीटर लांबीच्या लाटरोधक भिंतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. पाईल जेट्टी व अॅल्युमिनियम गँगवे उभारणीचे काम मे. डी.व्ही.पी. फॉरकॉन (JV) यांना देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे जंजिरा किल्ल्यावर येणाऱ्या वार्षिक साडेतीन ते चार लाख पर्यटकांना भरती-ओहोटीच्या काळातही सुरक्षित चढ-उतार सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पर्यटनवाढीस मोठी चालना मिळणार असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
प्रकल्पामध्ये मत्स्यव्यवसायासाठी आधुनिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. मासळी लिलाव गृह, जाळी विणण्याचे शेड, विश्रामगृह, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर तसेच स्वच्छतागृह सुविधा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय डांबरी रस्ते, काँक्रीटीकरण, विद्युतीकरण, सांडपाणी निचरा व प्रक्रिया व्यवस्था, पाण्याची टाकी आणि पंपहाऊस यांसारखी पायाभूत कामेही केली जाणार आहेत.
मच्छिमारांसाठी सुरक्षित बंदर व नौकानयन मार्ग उपलब्ध होणार असून बोट पार्किंग व वाहन पार्किंगची सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मत्स्यव्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.